म्हापशात उभारणार दिवंगत पर्रीकर तसेच डिसोजा यांचे पुतळे
By काशिराम म्हांबरे | Published: May 4, 2023 04:21 PM2023-05-04T16:21:54+5:302023-05-04T16:22:17+5:30
माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर आणि माजी उपमुख्यमंत्री कै. फ्रान्सिस डिसोजा यांचे पुतळे त्यांच्या जन्म गावी उभारण्याचा ठराव नगरपालिकेत सर्वमताने मंजूर
काशीराम म्हाबरे, लोकमत, म्हापसा: गोव्यातील माजी दोन दिवंगत नेते माजी संरक्षण मंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय ॲडव्होकेट फ्रान्सिस डिसोजा यांचे पुतळे त्यांच्या जन्म गावी म्हापसा शहरात उभारण्यात येणार आहेत. यासंबंधीचा ठराव येथील नगरपालिकेने सर्वमताने मंजूर केला आहे. म्हापसा नगरपालिकेच्या आज संपन्न झालेल्या सर्वसाधारण बैठकीत यासंबंधीचा ठराव सर्व मताने मंजूर करण्यात आला. या दोन्ही नेत्यांचे पुतळे म्हापसा नगरपालिकेच्या आवारात उभारण्यात येणार आहेत.
मूळ प्रस्ताव बहुजन हिताय संघातर्फे सादर करण्यात आलेला. त्यात त्यानी डिसोजा यांचा पुतळा शहरात उभारण्याची परवानगी नगरपालिकेजवळ मागितली होती. सादर करण्यात आलेल्या सदर प्रस्तावाचे नगरसेवकांनी स्वागत करून मूळ प्रस्तावात दुरुस्ती सुचवण्यात आली. स्वर्गीय मनोहर पर्रीकर हे देखील मूळ याच शहरातील असल्याने डिसोजा यांच्यासोबत पर्रीकरांचाही पुतळा उभारण्यात यावा अशा सूचना काही नगरसेवकांकडून मांडण्यात आल्या. सुचवण्यात आलेली दुरुस्ती नंतर मंजूर करण्यात आली. पुतळ्याचा मूळ प्रस्ताव सादर करणाऱ्या बहुजन हिताय संघाच्या प्रस्तावात करण्यात आलेली दुरुस्ती त्यांना मान्य नसेल नगरसेवक ॲडव्होकेट तारक आरोलकर यांनी पर्रीकर यांचा पुतळा स्वखर्चाने बांधून देण्याची घोषणा केली. आरोलकरांनी केलेली सूचना नंतर मंजूर करून घेण्यात आली.
स्वर्गीय मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसोजा हे दोन्ही नेते म्हापसा शहरतील आहेत. मात्र पर्रीकर यांनी गोवा विधानसभेची निवडणूक पणजी मतदार संघातून तर डिसोजा यांनी म्हापसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.