गोव्यात बिबट्यांची स्थिती प्रतिकूल; असुरक्षितता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:15 AM2023-08-17T11:15:43+5:302023-08-17T11:16:09+5:30

बिबट्यांना असुरक्षितता निर्माण झाली आहे.

status of leopards in goa is unfavorable | गोव्यात बिबट्यांची स्थिती प्रतिकूल; असुरक्षितता वाढली

गोव्यात बिबट्यांची स्थिती प्रतिकूल; असुरक्षितता वाढली

googlenewsNext

राजेंद्र पां. केरकर, पर्यावरणवादी 

डिचोली तालुक्यातल्या लाटंबार्सेतल्या नानोडा सोनारबाग येथील बाबल नाना वरक यांनी त्यांच्या जर्सी गायीची गोठ्यातली दोन पाडसे आणि बांबूच्या साटातल्या आठ बकन्या बिबट्यांनी लंपास केल्याची तक्रार २७ जानेवारी २०१० रोजी केली होती. बाबल वरक यांच्या कुटुंबाचा पशुपालन हा पारंपरिक उदरनिर्वाहाचा व्यवसाय असून, दोन पाडसे आणि आठ बकऱ्यांचा फडशा बिबट्याने पाडल्याने वरक कुटुंबीयांनी सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. 

लाटंबार्से हा डिचोली तालुक्यातला भौगोलिकदृष्ट्या आकाराने मोठ्या असलेल्या गावात एकेकाळी स्थानिक वृक्षवेलींनी नटलेली जंगले आणि गवताच्या कुरणांमुळे मृगकुळातली जनावरे मुबलक प्रमाणात होती. त्यांच्या मांसावर गुजराण करण्यासाठी बिबट्यांचे वास्तव्य येथे होते. परंतु जंगली मांसाची चटक लागलेल्या मंडळींसाठी फास, सापळे लावून रानडुक्कर, हरणे मारण्याचे आणि त्यांच्या मांसाची तस्करी करण्याचे प्रमाण वाढल्याने बिबट्यांनी सहज उपलब्ध होणारी भटकी कुत्री आणि गुरा-ढोरांची शिकार करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे

लाटंबा, वन, म्हावळिंगे या गावात बेकायदेशीररीत्या चिरेखणी, खडी क्रशरही सुरू असून, त्यामुळेही बिबट्यांना असुरक्षितता निर्माण झाली आहे. फाशात सापळ्यात अडकून बऱ्याचदा बिबटे मरणप्राय यातना भोगून मृत्युमुखी पडले आहेत. शेती, बागायतीच्या रक्षणाच्या नावाखाली काही ठिकाणी विजेच्या धक्क्याद्वारे जंगली श्वापदांना मारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. गेल्या दशकभरापासून गोव्यात केवळ जंगलातच नव्हे तर माळरानावर लावलेल्या सापळ्यात किंवा बटाट्याद्वारे होणाऱ्या बॉम्बस्फोटात रानडुकरे, हरणे यांच्याबरोबर बिबटे जायबंदी आणि मृत्युमुखी पडण्याची प्रकरणे उद्भवली आहेत. अशी अघोरी कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करणारी वनखात्याची यंत्रणा सक्रिय नसल्याने गुन्हेगारांचे आयतेच फावलेले आहे.

वन्यजीवांची हत्या, तस्करी आणि तत्सम गुन्ह्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात भरारी पथक आणि गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्यात गोव्यातली वनखात्याची यंत्रणा कूर्मगतीने काम करत आहे. त्यामुळे जंगल समृद्ध सत्तरी, सांगे, काणकोण, धारबांदोड्यासारखे तालुकेच नव्हे तर फोंडा, पेडणे, बार्देश, सासष्टी, केपेसारख्या तालुक्यात घोरपडीच्या कातड्यांसाठी, खवले मांजराच्या खवल्यांसाठी, हरण-रानडुकरांच्या मांसासाठी, गव्यांच्या भारदस्त शिंगांसाठी वन्यजीवांची शिकार निर्धोक होत आहे. अन्नपाण्यासाठी गलितगात्र होऊन बिबट्यांसारखे मार्जार कुळातले प्राणी लोकवस्ती, शेती आणि बागायतींकडे वळले आहेत. भटके कुत्रे, भटकी गुरे ढोरेच नव्हे तर गोठ्यातल्या म्हशी, बकऱ्या उचलून नेऊन बिबटे फस्त करत आहेत.

माहिती हक्क कायद्याद्वारे उपलब्ध माहितीत २०१७ साली वनखात्याने राज्यभरात ७१ बिबटे प्राणिगणनेत २०१४ साली नोंद झाल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून गोव्यात मानव आणि बिबट्या यांच्यातला संघर्ष विकोपाला जाण्याची प्रकरणे लक्षणीय संख्येने गावोगावी नव्हे तर वेर्णासारख्या नागरिकीकरणाच्या विळख्यात सापडलेल्या औद्योगिक वसाहतीत वाढलेली आहेत. गोव्यात लाटंबार्से, बोरी, वेर्णासारखी काही गावे बिबट्या प्रवण क्षेत्र होण्याच्या वाटेवर आहेत. मानव- बिबट्या यांच्यात निर्माण झालेल्या तणावाची कारणे कोणती याविषयी वनखात्याने खरं तर रीतसर संशोधन करणे गरजेचे होते. परंतु असे संशोधन झालेले नाही, असे स्पष्टीकरण वनखात्याच्या एका अधिकाऱ्याने केलेले आहे. पाळीव जनावरांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत कारणीभूत ठरलेल्या बिबट्यांच्या स्वभावधर्मात वागणुकीत, अन्नपाण्याची उपलब्धता, हवामान बदलाचे त्यांच्यावर झालेले परिणाम याचा अभ्यास आणि संशोधन वनखात्याने केलेले नाही. नुकसान भरपाईची प्रकरणे निकालात काढण्याच्या प्रकरणांना दिरंगाई होत आहे.

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध उपयोग करून बिबट्यांचे नैसर्गिक अधिवासातून होणारे स्थलांतर, मृगकुळातल्या जनावरांऐवजी पाळीव आणि भाकड जनावरांच्या रक्त, मांसाची बिबट्यांना लागलेली चटक आणि त्यामुळे मानवी वस्ती, शेती, बागायतीत वाढलेल्या संचारासंदर्भात अभ्यास आणि संशोधन करून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आली नाही तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊन मानव-बिबट्यांतले संबंध ताणले जातील आणि त्यात बिबट्यांवर नामशेष होण्याची पाळी येईल. गोव्याच्या एकूण अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी वनखात्याला राज्य सरकारकडून खूप कमी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचेही गंभीर दुष्परिणाम नियोजनबद्ध उपाययोजनेवर होत असल्याचे वारंवार उघडकीस आलेले आहे.


 

Web Title: status of leopards in goa is unfavorable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.