हत्तींचा व्यावसायिक वापर थांबवा, खंडपीठात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 09:22 PM2018-07-30T21:22:05+5:302018-07-30T21:22:20+5:30
हत्तींचे व्यावसायिक कामासाठी प्रदर्शन करून कमाविण्याचे धंदे बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल झाली आहे.
पणजी: हत्तींचे व्यावसायिक कामासाठी प्रदर्शन करून कमाविण्याचे धंदे बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल झाली आहे. राज्यात तांबडी सुर्ला, कुळे व इतर काही ठिकाणी हत्तींचा व्यावसायिक कामासाठी उपयोग होत असल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे.
कबीर गामा रॉय असे याचिकाकर्त्याचे नाव असून त्यांनी खंडपीठात हत्तींचा गोव्यात व्यावसायिक कमासाठी वापर केला जात असल्याचा दावा केला आहे. विशेषत: तांबडी सुर्ला व इतर काही ठिकाणी असलेल्या फार्ममध्ये हत्तींचा व्यावसायिक कामासाठी उपयोग होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. पर्यटक या हत्तींच्या पाठीवर बसतात, माहूत हत्तीला अंकुश टोचतो, त्याच्याकडून शारीरिक त्रासाची कामे करून घेतो, असे अनेक दावे करण्यात आलेले आहेत. हा कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट करून हे प्रकार बंद करण्याची मागणी करण्यात अाली आहे.
ह्या प्रकरणात सरकारला त्वरित हस्तक्षेप करण्याचा आदेश देण्यात यावा. हे हत्ती अभयारण्यात ठेवण्यात यावेत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सरकारने करावी. त्यासाठी खंडपीठाने आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारची भूमिका ठेवताना अतिरिक्त अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी याच मुद्द्यावरून एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय जो निवाडा देईल त्यावरून गोव्याची भूमिका ठरविली जाणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात पुढील सुनावणी १३ आॅगस्ट रोजी होणार आहे.