ग्रामसभांमध्ये असंतोषाचे वादळ; प्रकल्प लादू नका, अन्यथा अद्दल घडवू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 08:14 AM2024-10-21T08:14:50+5:302024-10-21T08:15:48+5:30

खासगी विद्यापीठाविरुद्ध ठराव; ग्रामस्थ एकवटले

storm of discontent in goa gram sabha do not impose the project otherwise we will have a conflict | ग्रामसभांमध्ये असंतोषाचे वादळ; प्रकल्प लादू नका, अन्यथा अद्दल घडवू 

ग्रामसभांमध्ये असंतोषाचे वादळ; प्रकल्प लादू नका, अन्यथा अद्दल घडवू 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गावाच्या हितासाठी कल्याणकारी प्रकल्प हवेत, पण जलस्रोत व गावे नष्ट करणारे प्रकल्प आणल्यास त्याला जोरदार विरोध असेल, असा सूर रविवारी झालेल्या अनेक ठिकाणच्या ग्रामसभांमधून व्यक्त झाला. 

ग्रामस्थांना नको असलेले प्रकल्प लादू नका. लोकविरोधी, गावच्या हिताविरोधी प्रकल्पाला आमचा यापुढेही ठामपणे विरोध राहील, असा निर्धार ग्रामसभांमधून व्यक्त झाला. काहीजण ग्रामसभांमध्ये बॅनर घेऊन आले होते.

जलस्रोत नष्ट करणारे प्रकल्प नकोच

आम्ही कुडचिरेवासीय कोणत्याही पक्षाच्या, व्यक्तीच्या विरोधात नाही. आमचा लढा गावाचे हित राखण्यासाठी आहे. सर्वांनी एकसंध राहणे, भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार रविवारी करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व पंचायत मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कुडचिरे येथे सुमारे ४५ हजार चौरस मीटर जागेत बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याला रविवारी ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शवला. गावची एकजूट दाखवण्यासाठी त्यांनी सातेरी मंदिरापर्यंत रॅली काढली व गावचे अस्तित्व अबाधित राहण्यासाठी देवतांना सामूहिक गाहाणेही घातले.

थिवी ग्रामसभेत विद्यापीठाला आक्षेप

थिवी येथील कोमुनिदाद जागेत पुणेस्थित विद्यापीठ संकुल उभारण्यात येणार आहे. जर हा प्रकल्प सुरू झाला, तर आधीच तुटपुंज्या असलेल्या मूलभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण पडेल. त्याचा फटका ग्रामस्थांना बसेल, याकडे थिवी ग्रामसभेत लक्ष वेधण्यात आले व ग्रामस्थांचा विरोध असल्याचे जाहीर केले. तसेच विद्यापीठ प्रकल्पाला मोठी जागा कोमुनिदादने दिली. पण घरांची बांधणी करण्यासाठी गावकरी मंडळींचे काही प्रस्ताव कोमुनिदादकडे प्रलंबित आहेत. त्यांच्यावर अन्याय होईल, जनावरांचा चारा, पाण्यावर अन्याय होईल. त्यामुळे वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ग्रामसभेत दिला.

खाणीविरोधात लढा देणार 

मूळगावच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत खाण व्यवसायाचा मुद्दा बराच तापला. खाण कंपनी ग्रामस्थांना, देवस्थान समिती आदींना गृहित धरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी सरपंच, पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वानुमते खाणीच्या विषयाबाबत एकसंध राहून लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

यापुढे जेटींना परवानगी नको

हळदोणा ग्रामसभेत असलेल्या जेटी वगळता यापुढे नवीन जेटी उभारणीसाठी परवानगी अजिबात देऊ नका, असा ठराव हळदोणा ग्रामसभेत एकमताने मंजूर केला. सरपंच आश्विन डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत माजी पंच सदस्य थॉमस तावारीस व पंचायत मंडळ उपस्थित होते. थॉमस यांनी या संबंधीच्या मांडलेल्या ठरावावर चर्चा झाल्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर केला.

मेगा प्रोजेक्ट्सना 'नो एन्ट्री'

गावची संस्कृती, हिरवाई सांभाळतानाच, परिसरातील पर्यावरणीय संतुलन कुठेच बिघडता कामा नये, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत पंचायत क्षेत्रात कुठेच मेगा बांधकाम प्रकल्पांना परवानगी देणार नसल्याचा ठराव वेलिंग, प्रियोळ, कुंकव्ये ग्रामसभेत घेण्यात आला. सरपंच हर्षा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. कुंकल्ये गावात हल्लीच एकाने रहिवासी भूखंड पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासंदर्भात शिवदास नाईक यांनी सदर भूखंडाला पंचायतीने परवानगी देऊ नये, तसेच उच्चस्तरावर या प्रकल्पाला विरोध करावा, असा ठराव मांडला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी हात उंचावून ठराव मंजूर केला. पंचायत मंडळाने ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत कुंकव्ये गावातच नव्हे, तर संपूर्ण पंचायत क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा मेगा रहिवासी प्रकल्प येणार नाही, असे आश्वासन लोकांना दिले. संजीव कुंकल्येकर यांनी यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

Web Title: storm of discontent in goa gram sabha do not impose the project otherwise we will have a conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.