सुर्ला गावाला वादळी पावसाचा तडाखा, तीन वाहनांवर झाड पडून नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 04:25 PM2023-10-13T16:25:53+5:302023-10-13T16:26:26+5:30
पावसाचा भामाईकर वाडा, मडकईकर वाडा तसेच इतर ठिकाणांना तडाखा बसला.
विशांत वझे
डिचोली : डिचोली तालुक्यातील सुर्ला पंचायत परसिरात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झाल्याने मुसळधार पावसामुळे झाडे पडून लाखोंचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्त्यावर व वीज वाहिन्यावर झाडे पडल्याने लोकांची गैरसोय झाली.
या पावसाचा भामाईकर वाडा, मडकईकर वाडा तसेच इतर ठिकाणांना तडाखा बसला. डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई उपजिल्हाधिकारी शिवाजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाच तास मदत कार्य करून अनेक ठिकाणी पडलेली झाडे, वीजवाहिन्या, खांब हटवले. तसेच पाच लाखांची मालमत्ताही वाचवली. वादळात दोन ट्रकवर झाड पडून मोठी हानी झाली. तसेच एका कारचेही बरेच नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील कौलेही उडाल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकसानीचा आढावा घेतला असून मदत कार्य करण्याचे आदेश दिले. पडझडीत नुकसान झालेल्याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
सरपंच विश्रांती सुर्लकर यांच्यासह पंचायत सदस्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तलाठी मार्फत नुकसानीचा आढावा घेण्यात येत असल्याचे सरपंचानी सांगितले. या भागात झालेल्या वादळात अनेक ठिकाणी वीज खांब पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याने नुकसान झाले. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वीज पूर्ववत करण्यासाठी वीज खात्याचे कर्मचारी व अधिकारी अविश्रांत कार्यरत होते, असे पंच सुभाष फौंडेकर यांनी सांगितले.