राज्यातील पर्यटन बळकट करण्यासाठी पर्यटन विभाग आणि मास्टरकार्ड यांच्यात धोरणात्मक सहकार्य करार
By समीर नाईक | Published: April 4, 2024 03:58 PM2024-04-04T15:58:34+5:302024-04-04T15:59:20+5:30
हा करार राज्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून पुढे आणण्यास अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
समीर नाईक, पणजी : नावीन्यपूर्ण अशा ‘अमूल्य भारत’ अर्थात प्राइजलेस इंडिया या पोर्टलाद्वारे राज्यात अंतर्गामी आणि देशांतर्गत पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाने मास्टरकार्ड सोबत सामंजस्य करार केला आहे. हा करार राज्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून पुढे आणण्यास अत्यंत प्रभावी ठरणार आहे. कारण मास्टरकार्डच्या प्राइजलेस इंडिया या पटलाच्या सहाय्याने राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी अनोखे, आकर्षक अनुभव लोकांपर्यंत पोहोचवता येतील.
मास्टरकार्ड सोबतची भागीदारी ही राज्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. यातून निश्चितच राज्यातील पर्यटन जगभर पोहचणार आहे. सदर करार अस्सल आणि संस्मरणीय अनुभव शोधणाऱ्या प्रवाशांच्या जागतिक नेटवर्कसाठी दरवाजे खुले करणार आहेत. धोरणात्मक विपणन उपक्रम आणि अनेक वाहिन्यांवरील आउटरीच प्रयत्नांद्वारे, राज्याचे पर्यटन प्रभावीपणे गोव्याला उच्चस्तरीय प्रवासाचे स्थळ म्हणून प्रोत्साहन देऊ शकते, तसेच प्रवाशांच्या कल्पनाशक्तीचा वेध घेते आणि पर्यटकांच्या राज्यातील शोधाच्या प्रवासाला सुरुवात करण्यास प्रेरित करते, असे पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका, यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.
गोवा भारतातील एक अग्रगण्य पर्यटन स्थळ आहे. हे धोरणात्मक सहकार्य गोव्याचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून आकर्षण वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या भागीदारीद्वारे, पर्यटन विभाग मास्टरक्लास गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, निसर्गरम्य स्थळे आणि जागतिक स्तरावर प्रवाशांना उत्साही आदरातिथ्य देण्यासाठी वचनबद्ध आहेत. या संधीचा उपयोग मास्टरकार्ड राज्यात सुरक्षित डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी देखील करेल, असे मास्टरकार्डचे दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष गौतम अग्रवाल यांनी सांगितले.
मास्टरकार्डच्या प्राइसलेस इंडिया पोर्टलवरून त्यांच्या कार्डधारकांना ४० हून अधिक देशांमध्ये योग्य पर्यटन अनुभव मिळतो. त्याचबरोबर २००० हून अधिक अनुभवांसह, कार्डधारकांकडे जगातील सर्वात रोमांचक स्थळांमधून निवडण्यासाठी अनेक ऑफर आहेत. कार्डधारक त्यांच्या जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ऑफर आणि फायदे वैयक्तिकृत करू शकतात.