...अन् 'ती' 96 गुरं पुन्हा शाकाहारी झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 08:50 PM2019-10-22T20:50:53+5:302019-10-22T20:54:32+5:30
गोशाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश
पणजी : कळंगुट-कांदोळीच्या भागातून प्रथम 76 आणि त्यानंतर 20 असे मिळून आतापर्यंत एकूण 96 बेवारस गुरे पकडून मये सिकेरी येथील गोशाळेत पाठविण्यात आली. ही गुरे शाकाहारी काही खातच नाहीत, त्यांना मांसाहाराचीच चटक लागली व ती मांसाहारी झाली अशा प्रकारचे वृत्त देशभर पसरले. त्यावर सर्वत्र चविष्ट अशी चर्चाही झाली. पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बऱ्याच प्रयत्नांनंतर व उपाययोजनांनंतर ही सगळी गुरे आता पुन्हा शाकाहारी झाली आहेत.
कळंगुटमध्ये रस्त्यावर बसणाऱ्या बेवारस गुरांना उचलून गोशाळेत नेण्याची मोहीम कळंगुटचे आमदार तथा राज्याचे मंत्री मायकल लोबो यांच्या सूचनेनंतर कळंगुटच्या पंचायतीने सुरू केली. ही गुरे रस्त्यावर अपघातास कारण ठरत होती. प्रथम कळंगुटमधील गुरे नेली गेली. मग कांदोळीतील रस्त्यांवर बसणाऱ्या वीस गुरांना उचलून नेऊन त्यांची मयेच्या गोशाळेत त्यांची रवानगी करण्यात आली. मंत्री लोबो यांनी मंगळवारी लोकमतला सांगितले की, यापुढे पर्रा येथे गुरे उचलण्याची मोहीम सुरू केली जाईल.
लोबो यांनी गोशाळेला भेट दिली होती. गोशाळेत या गुरांच्या खाण्याची सोय व्हावी म्हणून आपण गोशाळेला मदतही करू असे त्यांनी जाहीर केले. मात्र कळंगुट- कांदोळीहून आणलेली गुरे शाकाहारी खाद्य खात नाहीत असा अनुभव येऊ लागल्याने थोडी धावपळ उडाली. कळंगुटच्या पट्ट्यात अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची गर्दी आहे. तिथे गुरे कचऱ्यातील चिकनचे तुकडे, टाकाऊ मासळी वगैरे खाऊन मांसाहारी बनली होती. त्यांना पूर्णपणे मांसाहाराचीच सवय झाली होती. त्यामुळे गोशाळेत अडचण झाली. कळंगुट- कांदोळीची गुरे गोशाळेतील चारा, पाला किंवा इतर प्रकारचे कोणतेही शाकाहारी खाद्य खात नव्हती.
मंत्री लोबो यांनी सांगितले की, या गुरांनी शाकाहारी खाद्य खावे म्हणून गोशाळेत खूप प्रयत्न झाले. गुरांचे डॉक्टर्स तसेच अन्य अनुभवी व्यक्तींनी प्रयत्न केले. त्यांना शिजवलेले चणेदेखील खायला घातले गेले. काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर आता पुन्हा ही गुरे शाकाहारी खाद्य खाऊ लागली आहेत व त्यामुळे समस्या सुटली आहे.