पंचावर हल्ल्याने तणाव; रुमडामळ येथे दुकानावर दगडफेक, संतप्त जमावाचा पोलिस चौकीसमोर ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 08:43 AM2023-06-19T08:43:46+5:302023-06-19T08:44:38+5:30

संशयित तरुणास अटक

stressed by attack on panch at rumdamol stones were pelted at a shop an angry mob stood in front of the police post | पंचावर हल्ल्याने तणाव; रुमडामळ येथे दुकानावर दगडफेक, संतप्त जमावाचा पोलिस चौकीसमोर ठिय्या

पंचावर हल्ल्याने तणाव; रुमडामळ येथे दुकानावर दगडफेक, संतप्त जमावाचा पोलिस चौकीसमोर ठिय्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : रुमडामळ-दवर्लीचे पंच विनायक वळवईकर यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा रुमडामळ मैदानानजीक चाकू हल्ल्याचा प्रकार घडला. या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद रविवारी रुमडामळ भागात उमटले. संतप्त लोकांनी पंचायत क्षेत्रातील एका गोमांस विक्रीच्या दुकानावर दगडफेक केली. नंतर रुमडामळ येथे मायणा कुडतरी पोलिस चौकीसमोर जमाव एकत्र आला. या पंचायत क्षेत्रातील सर्व गोमांस विक्री दुकाने बंद करावी व अन्य बेकायदेशीर कामांवर कारवाई करावी, अशी मागणी उपस्थितांनी केली. या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी संशयित अयूब खान (२२) याला अटक केली. संशयित दवर्ली येथील असून, तो व्यवसायाने वेल्डर आहे.

शनिवारी रात्री उशिरा वळवईकर हे रुमडामळ येथे मैदानानजीक रस्त्यालगत मोटारीत बसलेले असताना एका अज्ञात व्यक्तीने कारच्या काचेवर काहीतरी वस्तू फेकली. यावेळी प्रसंगावधान राखून वळवईकर बाजूला सरकले. त्यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या व चाकूने हल्ला करण्यात आला. संशयिताने चाकू उगारल्यावर त्यांनी त्या व्यक्तीस ढकलले. संशयिताने फेकलेला चाकू मोटारीच्या सीटमध्ये घुसला. त्यानंतर संशयिताने पळ काढला. सुदैवाने त्यांचा जीव वाचला दरम्यान, रविवारी दुपारनंतर स्थानिकांनी समर्थ गड येथे बैठक घेतली. त्यानंतर फेरीही काढण्यात आली. या दरम्यान, एका गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर दगडफेक झाली. दगडफेकीच्या प्रकारानंतर या भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जादा कुमकही बोलावली.

शनिवारी रात्री चाकूहल्ल्याच्या घटनेमुळे रुमडामळ परिसरात वातावरण तंग बनले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री श्वानपथक व फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र मारेकरी सापडला नव्हता. हल्लाप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादंसंच्या ३०७ व ४२७ कलमांखाली खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. तपासानंतर संशयित अयुब खान (२२) याला अटक केली. उपनिरीक्षक दीपेश शेटकर पुढील तपास करत आहेत.

पोलिस ठाण्यासमोर तणाव

सायंकाळी एक गट पोलीस चौकीसमोर हजर असताना दुसऱ्या गटातील लोक रुमडामळ येथे एकत्र आले. त्यामुळे अनेक अफवा पसरल्या. परिस्थिती चिघळण्याचा धोका असल्याचे पाहून मायण- कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवी देसाई यांनी पोलीस चौकीसमोर हजर असलेल्या लोकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. नंतर मडगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई हेही तेथे आले. त्यांनी उपस्थितांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.

हल्ला पूर्वनियोजित?

दरम्यान, आपल्यावरील हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप विनायक वळवईकर यांनी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या रुमडामळ पंचायतीच्या ग्रामसभेत वळवईकर यांनी या भागात सुरु असलेल्या एका मदरशाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांच्यात व विरोधी गटात खडाजंगी उडाली होती. त्यानंतर वळवईकर यांनी गृहनिर्माण वसाहत परिसरात हिंदू धर्मियांचे शुभेच्छा फलक, छत्रपती शिवाजी महाराजांचे होडिंग लावले होते. त्यांचीही अज्ञातांनी नासधूस केली होती. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्याच कारणांमुळे हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दोषींवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री

दरम्यान, रविवारी लोहिया मैदानावर क्रांतिदिन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंच सदस्यावर झालेली ही हल्ल्याची घटना गंभीर आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. मी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: stressed by attack on panch at rumdamol stones were pelted at a shop an angry mob stood in front of the police post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.