सुकूर टँकरप्रकरणी कडक कारवाई; सुभाष शिरोडकर यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:22 PM2023-12-18T14:22:52+5:302023-12-18T14:23:42+5:30
सर्वस्वी टँकर्सवर अवलंबून असताना हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यावर लोकांची झोपच उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सुकूर येथे पाण्याचा टैंकर सांडपाण्यासाठी वापरण्याचा संतापजनक प्रकार घडल्याच्या प्रकाराची जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. मंत्र्यांनी या प्रकरणी अहवाल मागवला आहे. तिळारीचे पाणी बंद असल्याने आधीच पर्वरीवासीय पाण्यासाठी व्याकूळ बनले असून, सर्वस्वी टँकर्सवर अवलंबून असताना शनिवारी हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यावर लोकांची झोपच उडाली आहे.
याआधी सांकवाळ येथे तेथील रहिवाशांनी असाच एक टैंकर पकडून दिला होता. पिण्याचे पाणी पुरवण्यासाठीचे टँकर्स हॉटेल, कॅसिनो तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी वापरले जात आहेत. अशा टँकर्समधून आणलेले पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्यास धोका पोहोचू शकतो, त्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. साकवाळचे प्रकरण विधानसभेत गाजले होते. त्यानंतर प्रत्येक पाणीवाहू टँकरला कोड दिला जाईल, असे मंत्र्यांनी जाहीर केले होते.
अधिकृत माहितीनुसार, राज्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे ८५० नोंदणीकृत टँकर्स आहेत. प्रत्यक्षात ही संख्या याच्या कितीतरी पटीने जास्त असू शकते. सांकवाळच्या घटनेनंतर सरकारने पाणीवाहू टँकर्सना नोंदणी सक्तीची केली असून, प्रत्येक पाणीवाहू टैंकरला कोड दिला जाणार आहे. ही प्रक्रिया सध्या चालू आहे. दुसरीकडे ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राज्यात असून, सांडपाणी वाहून नेणारे १७० नोंदणीकृत टँकर्स असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई: जलस्रोतमंत्री
याबाबत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मी या प्रकरणी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने अहवाल मागवला आहे. आज, सोमवारपर्यंत हा अहवाल मिळणार असून, त्यानंतर कडक कारवाई केली जाईल. पाणीवाहू टँकरना कोड देण्याची प्रक्रिया चालू आहे. 'कोड' दिल्यानंतर हे प्रकार नियंत्रणात येतील. सरकार अशा प्रकरणात कोणाचीही गय करणार नाही.