गोव्यात समुद्र किनाऱ्यानजीक मच्छिमारी करणाऱ्या 54 ट्रॉलर्सवर कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 01:13 PM2017-11-08T13:13:22+5:302017-11-08T13:13:36+5:30
समुद्र किनाऱ्यापासून पाच किलोमिटर अंतराच्या आत ट्रॉलर्सना मच्छिमारी करण्यास मनाई असूनही गोव्यात अनेक ट्रॉलर्सवाले किनाऱ्याच्या अगदीजवळ मासेमारी करताना आढळून आले आहेत. अलीकडच्या काळात अशा ५४ ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात आली.
पणजी- समुद्र किनाऱ्यापासून पाच किलोमिटर अंतराच्या आत ट्रॉलर्सना मच्छिमारी करण्यास मनाई असूनही गोव्यात अनेक ट्रॉलर्सवाले किनाऱ्याच्या अगदीजवळ मासेमारी करताना आढळून आले आहेत. अलीकडच्या काळात अशा ५४ ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात आली. दुसरीकडे शेजारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच कारवार, केरळपर्यंतचे ट्रॉलर्स गोव्यापर्यंत येऊन मासेमारी करीत असल्याने पारंपरिक मच्छिमारांना त्याचा उपद्रव होत आहे.
५४ ट्रॉलर्सची सबसिडी रोखून धरण्यात आली आहे. यापुढे असे प्रकार आढळून आल्यास कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा खात्याचे मंत्री विनोद पालयेंकर यांनी दिला आहे. नियमभंग केल्याबद्दल या ट्रॉलर्सना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. या ट्रॉलर्सना इंधनासाठी दिली जाणारी सबसिडी रोखण्यात आली आहे.
१२ नॉटिकल मैल सागरी अंतरापर्यंत नियमितपणे खात्याच्या गस्तीनौका कार्यरत आहेत. नियमभंग करणाऱ्या ट्रॉलर्सवर कारवाई केली जात आहे. १५ मिटर लांबीची हायस्पीड बोट या कामी कार्यरत आहे. मिनी पर्सिननेटव्दारे मच्छिमारी करताना ४६ बोटी आढळून आल्या त्यांची केरोसिन सब्सिडी रोखण्यात आली आहे. ५४ ट्रॉलर्स जे किनाऱ्यावर मच्छिमारी करीत होते त्यातील ३१ ट्रॉलर्स सिकेरीनजीक तर २३ ट्रॉलर्स काकराजवळ सापडले. १३ ट्रॉलर्स तर एक नॉटिकल मैलपेक्षा कमी अंतरात मासेमारी करीत होत्या. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीतील किनारी पोलिसांकडून प्राप्त अहवालानुसार २४६ बोटी विना ओळखपत्र मच्छिमारीसाठी समुद्रात गेल्या.
दुसरीकडे बुल ट्रॉलिंग व एलईडी दिवे वापरुन केल्या जाणाऱ्या मासेमारीवर बंदी घालण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. काही कडक निर्बंध घालण्यासाठी १९८0 च्या मरिन फिशिंग रेग्युलेशन कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याचे संकेतही मच्छिमारीमंत्री पालयेंकर यांनी दिले आहेत. एलईडी मच्छिमारी बंदीचा नियम सर्व राज्यांना लागू व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पत्र लिहिणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले आहे.
एलईडी वापरुन केल्या जाणाºया मासेमारीच्या प्रश्नावर मंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. खात्याचे सचिव गोविंद जयस्वाल तसेच भारत सरकारचे मच्छिमारी विकास आयुक्त पॉल पांडियान, सेंट्रल मरिन फिशरीज रीसर्च इन्स्टिटयुटचे के. मोहम्मद यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कृषीमंत्री विजय सरदेसाई हेही यावेळी उपस्थित होते.
गोवा, केरळ, कर्नाटक व महाराष्ट्राचे अधिकारी, मच्छिमार प्रतिनिधी हजर होते. १२ सागरी मैल अंतराच्या आतही आधुनिक तंत्रज्ञान वापरुन (बुल ट्रॉलिंग) मोठे मासे पकडून आणले जातात तसेच एलईडी दिव्यांचाही मासेमारीसाठी वापर केला जातो. गोव्याचेच नव्हेत तर केरळ, मंगळूरु तसेच शेजारी सिंधुदुर्ग रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात ट्रॉलर गोव्याच्या हद्दीत येऊ न बुल ट्रॉलिंग करतात, अशी तक्रार आहे.
उद्या केंद्रीय मंत्र्यांना भेटणार
मंत्री पालयेंकर सध्या दिल्लीत असून उद्या गुरुवारी केंद्रीय कृषी तथा मच्छिमारी खात्याचे मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन गोव्यातील मासेमारीविषयक समस्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत. पावसाळ्यात मासेमारीबंदीचा काळ समान असावा तसेच बुल ट्रॉलिंग व एलईडी दिवे वापरुन केल्या जाणाऱ्या मासेमारीवर सर्वच राज्यांना बंदी लागू असावी, अशी मागणी पालयेंकर करणार आहेत.