खाण अवलंबितांचा पर्वरी सचिवालयावर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:37 PM2019-03-13T22:37:56+5:302019-03-13T22:38:07+5:30
खाणी पूर्ववत् सुरु केल्या जाव्यात या मागणीपुष्ठ्यर्थ खाण अवलंबितांनी उद्या गुरुवारी सकाळी ९.३0 वाजता पर्वरी सचिवालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.
पणजी : खाणी पूर्ववत् सुरु केल्या जाव्यात या मागणीपुष्ठ्यर्थ खाण अवलंबितांनी उद्या गुरुवारी सकाळी ९.३0 वाजता पर्वरी सचिवालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. येथील आझाद मैदानावर जमा होऊन नंतर पर्वरी सचिवालयावर मोर्चा नेला जाईल.
गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे निमंत्रक पुती गांवकर यांनी या मोर्चात खाण कामगार, ट्रकमालक, बार्जवाले तसेच मशिनरीमालक व अन्य मिळून ५ हजार लोक सहभागी होतील, असा दावा केला आहे. मोर्चा शांततापूर्ण मार्गाने असेल, असे त्यांनी सांगितले. गांवकर म्हणाले की, ‘गेल्या वर्षभराच्या खाणबंदीमुळे ३ लाखांहून अधिक अवलंबितांचा उदरनिर्वाह बुडाला. सरकारने खाण व्यवसाय विनाविलंब पूर्ववत् सुरु करायला हवा.’
मायनिंग पीपल्स फ्रंटच्या मतें हे सरकार जनताविरोधी आहे की जनतेसाठी आहे हे सिध्द करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने नेहमीच खोटी आश्वासने दिली. कायदादुरुस्तीसाठी कोणताही पाठपुरावा केला नाही, असा आरोप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या २0 जानेवारी रोजी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे राज्य सरकारने कायदेशीर हस्तक्षेप करुन खाणी पूर्ववत् सुरु करण्यासाठी पावले उचलावीत. सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि खाणी पूर्ववत् सुरु करुन लोकांचा विश्वास संपादन करावा.’
गोवा सुरक्षा मंचकडून पाठिंबा
या मोर्चाला गोवा सुरक्षा मंचने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी असे म्हटले आहे की, ‘राज्यात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतानाही खाणबंदीला वर्षभराचा काळ लोटला तरी तोडगा येऊ शकला नाही. सरकारने अवलंबितांची अवहेलना व क्रूर थट्टा चालवली आहे. खाणी पूर्ववत् सुरु करण्याची केवळ आश्वासनेच दिली. प्रत्यक्षात काहीच केले नाही. सरकारने केलेल्या या प्रतारणेबद्दल सरकारवर शक्तिप्रदर्शनानेच दबाव आणून जाब विचारावा लागेल. त्यामुळे आजच्या नियोजित मोर्चात जनतेनेही सहभागी व्हावे.’