गोवा फॉरवर्डचा सणसणीत स्ट्राईक रेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2017 02:23 AM2017-03-12T02:23:55+5:302017-03-12T02:27:10+5:30
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव पहिल्यांदाच
सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव
पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या गोवा फॉरवर्डच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असताना विजय सरदेसाई यांच्या या सेनेने चारपैकी तीन जागा जिंकून सर्वांत अधिक स्ट्राईक रेट असलेला पक्ष म्हणून आपले वर्चस्व निर्विवादपणे स्पष्ट केले. हे करतानाच आपल्याशिवाय कुणालाही सरकार करता येणार नाही, याचीही दक्षताही सरदेसाई यांनी घेतली.
या निवडणुकीत गोवा फॉरवर्डतर्फे विजय सरदेसाई यांच्यासह शिवोलीतून विनोद पालयेकर, साळगावातून जयेश साळगावकर तर वेळ्ळीतून अँथनी रॉड्रिग्स असे चार उमेदवार उतरविले होते. त्यापैकी विजय सरदेसाई यांनी आपली जागा राखतानाच विनोद पालयेकर यांनी मंत्री दयानंद मांद्रेकर यांना शिवोलीतून तर जयेश साळगावकर यांनी मंत्री दिलीप परुळेकर यांना साळगावातून अस्मान दाखवित जायंट किलर होण्याची किमया करून दाखविली. विजय सरदेसाई यांच्याविरोधात भाजपने काँग्रेसला हाताला धरून आघाडी उघडलेली असतानाही भाजपचे दामू नाईक यांच्यावर त्यांनी १,३३४ मतांनी विजय मिळविला. शिवोलीत पालयेकर यांनी १0,१८९ मते मिळवित भाजपचे मुरब्बी उमेदवार असलेले दयानंद मांद्रेकर यांच्यावर १,४४१ मतांनी तर जयेश साळगावकर यांनी ९७३५ मते घेताना दिलीप परुळेकर यांच्यावर २१३७ मतांनी विजय मिळविला.
या कामगिरीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरदेसाई म्हणाले, गोवा फॉरवर्डची घोडदौड अडविण्यासाठी काँग्रेसने भाजपशी छुपी हातमिळवणी करूनही त्यांचा डाव साधला नाही. आम्ही या निवडणुकीत निर्विवादपणे यश मिळविताना गोंय व गोंयकारपणाचा मुद्दा पुढे आणला होता, तो लोकांना पसंत असल्याचे दिसून आले. आता हा पक्ष संपूर्ण गोव्यात विस्तारित करण्यावर आमचा भर असेल. सरकार स्थापनेत
गोवा फॉरवर्डची कोणती भूमिका असेल असे विचारले असता, पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीनंतरच यासंंबंधी आम्ही निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.