मोबाईलवर बोलल्यामुळे आई-वडिलांनी दम दिला म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:07 PM2019-08-14T22:07:32+5:302019-08-14T22:08:32+5:30
दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत मोबाईलवरुन बोलताना तिला तिच्या आई-वडिलांनी बघितले होते.
मडगाव: मोबाईलशिवाय कुणालाच करमत नाही. मोबाईलवरुन आपल्या मित्रांसोबत संभाषण करीत असल्यामुळे पालकांनी दम भरल्याने एका तेरा वर्षीय शाळकरी विदयार्थिनीनीने आत्महत्या करण्याची दुदैवी घटना गोव्यात घडली. राज्यातील दक्षिण गोव्यातील मायणा- कुडतरी पोलीस ठाण्याच्या अख्यत्यारीत आज बुधवारी दुपारी ही घटना घडली. मूळ बिहार येथील हे कुटुंब नेसाय या भागात भाड्याच्या घरात रहात होते. याच भागातील एका शाळेत मयत मुलगी सातवी इयत्तेत शिकत होती.
दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत मोबाईलवरुन बोलताना तिला तिच्या आई-वडिलांनी बघितले होते. झालेल्या प्रकाराबद्दल पालकांनी त्या मुलीला दमही दिला होता. त्यामुळे रागाच्या भरात तिने गळफास लावून आपले जीवन संपविण्याचा टोकाचे पाऊल उचलले. काल दुपारी दुपटट्याने गळफास लावून त्या मुलीने आत्महत्या केली. मायणा - कुडतरी पोलिसांनी मागाहून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मृतदेह शवचिक्तिसेसाठी शवागरात ठेवला आहे.मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर पुढील तपास करीत आहे.