विद्यार्थ्यांनी घेतली कोंकणी लेखकांची भेट
By समीर नाईक | Published: March 19, 2024 03:15 PM2024-03-19T15:15:22+5:302024-03-19T15:15:47+5:30
पणजी: भारतीय भाषा विभाग, धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय, गोवा कोकणी अकादमी आणि दाल्गाद कोंकणी अकादमी याच्या संयुक्त विद्यमाने ...
पणजी: भारतीय भाषा विभाग, धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालय, गोवा कोकणी अकादमी आणि दाल्गाद कोंकणी अकादमी याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘विद्यार्थी लेखकाचे भेटेक’ या कार्यक्रमात कोंकणीतले प्रसिद्ध लेखक रामनाथ गावडे आणि विन्सी क्वाद्रूस यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली.
दाल्गाद कोकणी अकादमीच्या सभागृहात सादर कार्यक्रम नुकताच झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दाल्गाद कोंकणी अकादमीचे अध्यक्ष सॅल्सो फर्नांडिस, लेखक रामनाथ गावडे आणि विन्सी क्वाद्रूस तसेच महाविद्यालयाच्या भारतीय भाषा विभाग प्रमुख अंजू साखरदांडे उपस्थित होत्या.
लहान वयात कथा लिहिणे आणि वाचणे यामुळे मला अनेक अनुभव आले. अनुभवाने कथा आकार घेऊ लागल्या. अनेक कथा लिहिल्या गेल्या, पण पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार पक्का झाल्यावर कथा निवडणे अवघड झाले. कधी मी कथा लिहिल्या तर कधी कथेने स्वतःला माझ्याकडून लिहवून घेतले, असे रामनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले.
अनुभवांमुळे कथा समृद्ध होते. लहानपणापासूनचे साहित्याचे वाचन झाल्याने फार आधार झाला. रोमन तसेच देवनागरी भाषेत लिहिल्याने कथेसाठी चांगले वाचक मिळाले. आजच्या मुलांनी कथा लिहिल्या पाहिजेत आणि लिहित राहिल्या पाहिजेत. कथेच्य क्षेत्रात सातत्य महत्त्वाचे असते. तेव्हाच कथा आणि कथाकार समृद्ध होतात, असे विन्सी क्वाद्रूस यांनी यावेळी सांगितले.
कोकणी अकादमीच्या 'विद्यार्थी लेखकाचे भेटेक’ या योजनेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, राज्यातील लेखकांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे हा यामागचा मुख्य हेतू होता, असे भाषा विभागाच्या प्रमुख अंजू साखरदांडे यांनी सांगितले.
दाल्गाद कोकणी अकादमीचे अध्यक्ष सॅल्सो फर्नांडिस यांनी आपल्या प्रमुख भाषणात दाल्गाद कोकणी अकादमीच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला सुमारे ५० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय भाषा विभागाचे सहायक प्राध्यापक गौरांग भांडीये यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धेंपे महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. वृंदा बोरकर यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक प्राध्यापिका विदिता शेट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व लेखकाशी संवाद साधला तर सहाय्यक प्राध्यापिका दीपा रायकर यांनी आभार मानले.