विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; १४०० किलो निर्माल्याचं खतात रुपांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:52 PM2019-09-17T22:52:02+5:302019-09-17T22:56:01+5:30
पॉप्युलर हायस्कूलच्या उपक्रमाला मडगावातील मंदिरांकडून सकारात्मक प्रतिसाद
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: मनात आणले तर शाळेतील विद्यार्थीही लोकांची मानसिकता बदलू शकतात याचा प्रत्यय मडगावच्या पॉप्युलर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणून दिला. केवळ मडगावातील कोंब वाड्यापुरती या विद्यालयाने सुरु केलेल्या ‘निर्मल निर्माल्य’ या उपक्रमाला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की चतुर्थीच्या अकरा दिवसांच्या काळात तब्बल 1400 किलो निर्माल्य कंपोस्ट खतात रुपांतरित करण्यासाठी गोळा झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचाही उत्साह आता एवढा वाढला आहे की मडगावातील मंदिराच्या आवारातही हा उपक्रम सुरु करण्यासाठी त्यांचे हात आता शिवशिवू लागले आहेत.
यंदा चतुर्थीच्यावेळी निर्माल्य विसर्जनामुळे जे प्रदुषण निर्माण होते ते टाळण्यासाठी मडगावच्या या हायस्कूलने यंदा ‘निर्मल निर्माल्य’ ही योजना सुरु करण्याचे ठरविले. या योजनेत त्यांना शास्त्रीय सहकार्य करणाऱ्या अल्टर एनर्जीचे समृद्ध हेगडे देसाई यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला ही योजना कोंब वाड्यापुरतीच लागू करण्याचे आम्ही ठरविले होते. कोंब वाड्यावरील निर्माल्य गोळा करुन त्याचे खतात रुपांतर करण्याची ही योजना होती. त्यासाठी दोन कंपोस्ट बिन्सची तजवीज करण्यात आली होती. यासाठी विद्यालयातील मुलांनी संपूर्ण कोंब वाड्यावर फिरुन निर्माल्याचे विसर्जन न करता ते शाळेच्या स्वाधीन करा यासाठी लोकांमध्ये जागृती केली होती. मात्र या उपक्रमाला एवढा पाठिंबा मिळाला की दवर्ली पंचायत क्षेत्रतील गणपतींचे तसेच मडगावातील सार्वजनिक गणोशोत्सवाचे निर्माल्य मोठ्या प्रमाणावर जमा झाले. या निर्माल्याचे खतात रुपांतर करण्यासाठी आम्हाला आणखी तीन बिन्सची सोय करावी लागली. सध्या ही खत प्रक्रिया सुरू असून त्यातून किमान 140 किलो कंपोस्ट तयार होईल असे हेगडे देसाई यांनी सांगितले.
मंगळवारी दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी पॉप्युलर हायस्कूलला भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा अग्रनायक या म्हणाल्या, या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून कोंब भागातील विठ्ठल मंदिराकडूनही आता आम्हाला निर्माल्य देण्याची तयारी सुरु झाली आहे. या कामात विद्यार्थ्यांचा उत्साह तर एवढा आहे की, मडगावातील इतर मंदिरातील निर्माल्यदेखील गोळा करुन त्यावर खत प्रक्रिया करण्याची योजना त्यांनी आखली असून काही मंदिराकडूनही त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे असे त्या म्हणाल्या.
हेगडे देसाई हे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे तज्ञ असून त्यांनीच या मुलांना या कामासाठी प्रोत्साहित केले. या मुलांनी केवळ जागृतीचेच काम केले असे नव्हे तर आलेल्या निर्माल्यांतून नको असलेला कचरा त्यांनी स्वत:च्या हातांनी बाजूला केला. यातील काही मुलांना या प्रक्रियेबाबत प्रशिक्षित करण्यात आले असून आता या प्रकल्पाच्या कामावर ही मुलेच स्वत: लक्ष ठेवतात असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाला आलेल्या यशानंतर या मुलांनी पॉप्युलरच्या आवारात आता उद्यानही तयार करायचे ठरविले असून मंगळवारी सावईकर यांच्या हस्ते या उद्यानाच्या जागेत झाडे लावण्यात आली. निर्मल निर्माल्य प्रकल्पातून जे खत तयार होणार त्याचा वापर या उद्यानासाठी करण्यात येणार असून कोंब भागातील ज्या घरातून निर्माल्य आले त्यांनाही काही प्रमाणात खत पोहोचते करण्यात येणार असल्याचे अग्रनायक यांनी सांगितले.