पाण्याची पर्यायी व्यवस्था करणार: जलस्रोतमंत्री, अस्नोडा प्रकल्पात अतिरिक्त जलशुद्धीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2024 09:05 AM2024-08-19T09:05:37+5:302024-08-19T09:07:00+5:30
टंचाई भासणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्वरी पठारासह साळगाव, कांदोळी, कळंगुट, गिरी व हणजुण आदी भागांना पाणी टंचाईची झळ पोचू नये म्हणून जलस्रोत खात्याने अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पात अतिरिक्त दहा टक्के जलशुध्दीकरण प्रक्रिया सुरू करून ते पाणी थेट पर्वरीला देण्याची सोय केली आहे. तिळारीच्या कालव्याला शेजारी महाराष्ट्रात कुडासे येथे भगदाड पडल्याने या कालव्यातून पाणी पुरवठा बंद झाला आहे. पर्वरीतील जलशुध्दीकरण प्रकल्पाला तिळारीचे पाणी येते. या पाण्यावर अवलंबून असलेला पर्वरीतील हा प्रकल्प कालवे फुटल्यावर कोरडा पडतो आणि वरील भागातील लोकांचे प्रचंड हाल होतात.
तिळारीचे पाणी गोव्यासाठी बेभरवशाचे बनले आहे. कालवे बांधून २५ ते ३० वर्षे उलटली आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ते वरचेवर फुटत असतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी कालवे बंद असतातच. शिवाय अधूनमधून कालवे फुटतात. गेल्या डिसेंबरमध्ये तिळारीच्या कालव्याचे गेट लॉक झाले. त्यामुळे पुणे येथून खास तंत्रज्ञ मागवावे लागले होते. पाच ते सहा तंत्रज्ञाना गेटचे लॉक उघडण्यासाठी सुमारे २० तास लागले होते. त्यानंतर तिळारीचे पाणी वाटेत कुठेही न वळवता थेट पर्वरी प्रकल्पाला सोडण्यात आले होते.
टंचाई भासणार नाही
जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पर्वरी येथे जलकुंभात दोन दिवस पुरेल एवढे पाणी आहे. शिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून आमठाणे येथून १०० एमएलडी पाणी आम्ही अस्नोडा प्रकल्पाला घेत असून, तेथून शुध्दीकरण करून थेट पर्वरीला पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही टंचाई भासणार नाही. कालव्याच्या डागडुजीचे काम युध्दपातळीवर सुरू असून, दोन दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. मी पुन्हा आज, सोमवारी याचा आढावा घेणार आहे.'