देशाला आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद सहकारात - सुभाष शिरोडकर
By आप्पा बुवा | Published: October 20, 2023 06:49 PM2023-10-20T18:49:09+5:302023-10-20T18:49:49+5:30
सहकार खात्यातर्फे चार नव्या बहुउद्देशीय सहकारी संस्थांना मंजुरीपत्रे देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते.
शिक्षणानंतर दुसरे सर्वात महत्त्वाचे कुठले खाते असेल तर ते सहकार हे खाते आहे. सहकार क्षेत्रात असणाऱ्या लोकांनी त्यासाठी नियोजनपूर्वक काम करायला हवे. केंद्र सरकारने सुद्धा सहकार खात्याचे महत्त्व लक्षात घेऊन पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरू केले आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकास साधता येतो. देशाला आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद सहकारात आहे. असे उद्गार सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले. सहकार खात्यातर्फे चार नव्या बहुउद्देशीय सहकारी संस्थांना मंजुरीपत्रे देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, सहकार खात्याचे उपनिबंधक सिताराम सावळ, क्षेत्रीय कृषी अधिकारी संतोष गावकर, गोवा डेरीचे डॉ. रामा परब आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की सहकार क्षेत्रची आम्हाला अजून भरभराट करायची आहे. त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी ध्येय निश्चित करून काम करायला हवे. प्रत्येकाने आपला तालुका सहकार क्षेत्रात अग्रेसर करणार असे जरी स्वप्न पाहिल्यास सहकार चळवळ गोव्यात आणखीन समृद्ध होत जाईल.
सहकारी संस्थावर अध्यक्षपद व संचालक पदी असलेल्या लोकांना आवाहन करताना ते म्हणाले की पद मिरवण्याकरता म्हणून सहकार क्षेत्रात येऊ नका. त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक पदाधिकाऱ्यानी सहकार क्षेत्र गांभीर्याने घेतल्यास त्या संस्थेचा उद्धार तर होईलच, पर्यायाने देशाच्या सहकार क्षेत्राला बळकटी येईल. यापुढे तालुकास्तरीय काम करत असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थांचा त्रीमासिक मूल्यांकन केले जाईल. प्रत्येक तीन महिन्यानंतर एका तालुक्याचे मूल्यांकन करून नक्की कुठली संस्था कशा प्रकारे काम करते याचा लेखाजोखा संस्थेच्या अध्यक्षांकडून घेण्यात येईल.
यावेळी राज्यात कार्यरत असलेल्या पतसंस्थांना आवाहन करताना ते म्हणाले की पतसंस्था चालवणाऱ्या संचालकांनी लक्षात घ्यायला हवे की पतसंस्था म्हणजे सावकारची पतपेढी नाही. पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य व गरीब लोकांचा उद्धार व्हायला हवा. त्यासाठीच यापुढे मर्जीनुसार व्याजदर लावता येणार नाही. सरकार यापुढे 13 टक्के व्याजदर निश्चित करणार आहे. अशाने सामान्य लोकांना कर्ज फेडणे सोपे होईल. अप्रत्यक्ष फायदा त्या पतसंस्थेला सुद्धा होणार आहे.
सहकार क्षेत्रातील काही कायदे हे फार जुने आहेत याची जाण सरकारला आहे. त्याकरता सहकार क्षेत्रात नव्हे बदल आणण्यासाठी व सहकार क्षेत्र चांगल्या तऱ्हेने चालण्यासाठी नवीन कायदे अमलात आणले जाणार आहे. त्याची कार्यवाही काही दिवसातच होणार आहे. असे सुतोवाच सुद्धा यावेळी शिरोडकर यांनी केले.
यावेळी बोलताना फळदेसाई म्हणाले की गोव्यात कोमूनिदाद ह्या संस्थेकडे व इतर काही संस्थांकडे पडीक जमिनी आहेत. त्या जमिनी सरकारच्या माध्यमातून लागवडीखाली आल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याबरोबरच त्या संस्थाना सुद्धा त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो. परंतु यासाठी चांगल्या कायद्यांची गरज आहे. जेणेकरून जमिनी देण्यासाठी लोक पुढे येतील. सुरुवातीला पंकज मराठे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जाण यांनी केले.