सुभाष वेलिंगकर पूर्णवेळ राजकारणात उतरण्याबाबत सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:26 PM2018-10-26T12:26:16+5:302018-10-26T13:33:19+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पूर्णवेळ राजकारणात उतरून गोव्यातील सध्याची राजकीय नेतृत्वाची पोकळी भरून काढावी, अशा प्रकारचा आग्रह सर्व स्तरांवरून वाढू लागला आहे.

subhash velingkar is careful about Entering politics | सुभाष वेलिंगकर पूर्णवेळ राजकारणात उतरण्याबाबत सावध

सुभाष वेलिंगकर पूर्णवेळ राजकारणात उतरण्याबाबत सावध

Next

सदगुरू पाटील

पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पूर्णवेळ राजकारणात उतरून गोव्यातील सध्याची राजकीय नेतृत्वाची पोकळी भरून काढावी, अशा प्रकारचा आग्रह सर्व स्तरांवरून वाढू लागला आहे. विशेषत: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पूर्णपणे आजारी आहेत व ते घराबाहेर पडू शकत नाहीत,अशावेळी भाजपामध्येही यादवी माजल्यासारखी स्थिती असून वेलिंगकर यांनी पर्यायी नेतृत्व म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षा वेलिंगकरांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी बंड केलेले संघाचे अनेक स्वयंसेवक आणि संघाबाहेरील वेलिंगकर समर्थक व्यक्त करत आहेत. मात्र स्वत: वेलिंगकर यांनी सावध भूमिका घेतलेली आहे.

राजकारणात अनेक तडजोडी कराव्या लागतात. असंगांशीही संग करावा लागतो. ज्यांच्या विचार व प्रवृत्तीशी पटत नाही त्यांच्यासोबतही ठाण मांडून बसावे लागते. पर्रीकर यांना हे जमले पण वेलिंगकर यांना हे जमेल काय असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत. वेलिंगकर हे भारत माता की जय, भारतीय भाषा सुरक्षा मंच अशा संघटनांशी तसेच विद्याप्रबोधिनीसारख्या शिक्षण संस्थेशी जोडले गेलेले आहेत. गोवा सुरक्षा मंचासारख्या नवस्थापित राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत पण या पक्षाचे ते अप्रत्यक्ष सल्लागार म्हणून काम पाहतात. वेलिंगकर यांनी 45 वर्षापेक्षा जास्त काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम गोव्यात केलेले आहे. शिवाय शिरोडा, मांद्रे, डिचोली, पर्वरी आदी ठिकाणी त्यांनी विद्यादानाचे यशस्वी काम केले असून त्यांच्याविषयी समाजात अत्यंत आदराची भावना आहे. वेलिंगकर हे पूर्णपणो राजकारणात सक्रिय व्हावे, अशी मागणी काणकोणपासून म्हापशापर्यंतच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन नुकतीच केली.

सोशल मीडियावरूनही ही मागणी सुरू आहे पण वेलिंगकर राजकारणात सक्रिय झाले तर कोणत्या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येऊ शकतात हा प्रश्न अनुत्तरीत आहे. निवडणुका जिंकण्यासाठीचे राजकारण हे खूप वेगळेच असते. वेलिंगकर यांना ते जमणार नाही, कारण आदर असला तरी, सगळेच लोक अशा उमेदवाराला मत देतात असे नाही, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. वेलिंगकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचसह अन्य काही संस्थांशी व स्वत:च्या समर्थक कार्यकर्त्यांशी तूर्त चर्चा चालवली आहे. आपण पूर्णवेळ राजकारणात उतरावे की उतरू नये याचा कानोसा ते घेत आहेत. वेलिंगकर यांनी निवडणूक न लढवता गोवा सुरक्षा मंचचे नेतृत्व अधिकृतरित्या स्वीकारावे अशी सूचनाही पुढे येत आहे. दरम्यान, भाजपाचा आरंभ गोव्यात झाला तेव्हा दहा वर्षात भाजपाचा मुख्यमंत्री गोव्यात असेल, असे विधान आपण केले होते व ते खरे ठरले, यापुढे गोवा सुरक्षा मंचही पाच वर्षानंतर सत्तेवर येईल अशा अर्थाचे विधान वेलिंगकर यांनी मांद्रे येथे सभेत केले. 

Web Title: subhash velingkar is careful about Entering politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.