सुभाष वेलिंगकर यांची तीन तास चौकशी; पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 11:51 AM2024-10-12T11:51:17+5:302024-10-12T11:52:18+5:30
राष्ट्रीय सेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना काल सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य प्रकरणी डिचोली पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावले.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राष्ट्रीय सेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना काल सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य प्रकरणी डिचोली पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावले. त्यानुसार ते सकाळी १० वाजता पोलीस ठाण्यात हजर झाले. तीन तास वेलिंगकरांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना वेलिंगकर म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयातच काय ते ठरेल. सध्या आपण कोणत्याच विषयावर भाष्य करणार नाही. ज्या-ज्या वेळी पोलीस बोलवतील त्यावेळी आपण चौकशीसाठी त्यांना पूर्ण सहकार्य करू, असे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेलिंगकर गुरुवारी पावणे चारच्या सुमारास डिचोली पोलिस ठाण्यात उपस्थित झाले होते. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा जबाब घेण्यात आला होता. त्यानंतर अर्ध्या तासात चौकशी झाल्यानंतर ते परतले होते. काल पुन्हा त्यांना पोलिसांनी बोलावले.