गोव्यात वीज सुधारणांसाठी भूमिगत वीज वाहिन्या हाच पर्याय : मडकईकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 07:24 PM2018-06-01T19:24:13+5:302018-06-01T19:24:13+5:30
राज्यात वीज पुरवठ्याची जी समस्या दिसून येते, तो जुन्या साधनसुविधांचा परिणाम आहे.
पणजी : राज्यात वीज पुरवठ्याची जी समस्या दिसून येते, तो जुन्या साधनसुविधांचा परिणाम आहे. वेळच्या वेळी वीज साहित्याची खरेदी न झाल्याने व अनेक जुने ट्रान्सफॉर्मर वादळ-वा-यामुळे निकामी ठरत असल्याने वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होते. यावर भूमिगत वीज वाहिन्या हाच उपाय व पर्याय ठरत असल्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
भूमिगत वीज वाहिन्या देखील बांधकाम कंत्राटदार तोडून टाकतात व त्यामुळे पणजीत समस्या निर्माण होते. सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा विभाग तसेच मलनिस्सारण विभाग आदी विभागांच्या कंत्राटदारांकडून रस्ते वाट्टेल तसे खोदले जातात. वीज वाहिन्यांची पर्वा केली जात नाही. वीज तुटल्यानंतर मग त्यावर माती टाकून ते पसार होतात. यामुळेही वीज पुरवठा ठप्प होतो, असे मंत्री मडकईकर म्हणाले. राज्यात जिथे वन क्षेत्र आहे, अशा 1 हजार किलोमीटर लांबीच्या क्षेत्रत एरियल बंच केबलिंगचे काम सध्या सुरू आहे, असेही मडकईकर यांनी नमूद केले.
केंद्र सरकारने वीज क्षेत्रतील सुधारणांसाठी एकूण 1 हजार 70 कोटींचा निधी तत्त्वत: मंजुर केला आहे. यापुढे आम्ही तपशीलवार प्रस्ताव पाठवू. सरकारने पाचशे कोटींच्या कामांच्या निविदा नुकत्याच जारी केल्या आहेत. वेर्णा, कळंगुट, साळगाव, साळ, बादे- शिवोली, करासवाडा अशा भागांमध्ये नवी वीज उपकेंद्रे उभी केली जातील. कळंगुटच्या केंद्रावर 186 कोटींचा खर्च येणार आहे तर वेर्णाला 120 कोटींचा खर्च केला जाईल. कदंब वीज उपकेंद्राचा दर्जा वाढविला जाईल. 4 कोटींचे नवे कंडक्टर्स खरेदी केले जाणार आहेत. तीन हजार वीज खांबे खरेदी केले आहेत. चौदा नवे वीज ट्रान्सफॉर्मर खरेदी केले जातील. केंद्राने डाटा सेंटरसाठी 90 कोटी रुपये वीज खात्याला दिले आहेत. 99 टक्के काम पूर्ण झाले आहे, असे मंत्री मडकईकर यांनी सांगितले.
कुंकळ्ळीत 7.75 कोटींची कामे
दरम्यान, कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्लाफास डायस यांनी वीज समस्येविरुद्ध बंदची हाक दिली आहे, त्याविषयी बोलताना मंत्री मडकईकर म्हणाले, की कुंकळ्ळीत एकूण 7.75 कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी इस्टीमेट तयार झाला आहे. आमदार डायस हे माङयाकडे कधीच वीजविषयक कामे घेऊन आले नाहीत. विधानसभेत बोलले म्हणून कामे होत नाहीत. त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. कुंकळ्ळीत 554 वीज खांब बदलले जातील. 5.3 किलोमीटरसाठी नवी उच्चदाबाची वीज वाहिनी टाकली जाईल. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत वीजविषयक 11 कोटींची कामे करण्यासाठी आदेश दिला आहे. ही सगळी कामे सुरू असताना आमदार डायस यांनी बंदची हाक द्यावी हे त्यांचे अपयश व नैराश्य दाखवून देते, असे मडकईकर म्हणाले.