गोव्याचे ज्येष्ठ मंत्री डिसोझा यांचे अचानक काढलं एस्काॅर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 09:50 AM2017-11-01T09:50:44+5:302017-11-01T09:51:03+5:30
गेले दीड महिना विदेश दौऱ्यावर असलेले व मंगळवारी भारतात परतलेले पर्रीकर मंत्रिमंडळातील भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे एस्काॅर्ट सरकारने अचानकश काढून घेतले आहे.
पणजी : गेले दीड महिना विदेश दौऱ्यावर असलेले व मंगळवारी भारतात परतलेले पर्रीकर मंत्रिमंडळातील भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे एस्काॅर्ट सरकारने अचानकश काढून घेतले आहे. गोव्याच्या राजकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय बनला आहे. मंत्री डिसोझा यांना एस्काॅर्टमुळे एकूण दहा पोलिसांचा व एका पायलट जीपचा ताफा मिळाला होता. पाच वर्षांपूर्वी डिसोझा हे उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्याना हा ताफा दिला गेला होता. गेली पाच वर्षे त्यानी तो वापरला.
गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या 14 मार्च रोजी आले. त्यावेळपासून डिसोझा हे ज्येष्ठ मंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री नाही. तरी देखील गेले सात महिने एस्काॅर्ट म्हणजेच दहा पोलिसांचा ताफा आणि पायलट गाडी डिसोझा यांच्याकडेच राहिली.
डिसोझा हे आजारी असून गेला दीड महिना ते विदेशात होते. ते भारतात परत असतानाच त्यांच्या सेवेतील एस्काॅर्ट गोवा सरकारने कमी केल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
आता फक्त दोन अंगरक्षक डिसोझा यांच्याकडे राहिले आहेत. डिसोझा अजून गोव्यात पोहचलेले नाहीत. दरम्यान डिसोझा यानी फोनवरून लोकमतला सांगितले की माझे एस्काॅर्ट काढावे अशी विनंती मी स्वत: काही महिन्यांपूर्वी केली होती. त्याची अमलबजावणी आता झाली. त्यात मला काही धक्कादायक वाटत नाही. मी उपमुख्यमंत्री नसताना देखील माझ्याकडे एस्काॅर्ट काही महिने ठेवले गेले ही गोष्ट खरी आहे. मी फक्त शासकीय कामाला जातानाच त्याचा वापर करत असे. मला एस्काॅर्ट नसले म्हणून काहीच बिघडत नाही. सर्वांच्याच सुरक्षेचा आढावा सरकारने घेऊन हा बदल केला आहे अशी माहिती मला मिळाली आहे. मी आता प्रकृतीने ठीक आहे.