नगर विकास संचालक गुरुदास पिळर्णकर यांची अचानक स्वेच्छा निवृत्ती
By किशोर कुबल | Published: December 15, 2023 12:38 PM2023-12-15T12:38:52+5:302023-12-15T12:41:07+5:30
१९८९ साली मे महिन्यात केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या सेवेत ते रुजू झाले.
पणजी : प्रशासनातील ज्येष्ठ श्रेणी अधिकारी, नगर विकास खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी अचानक सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.
पिळर्णकर यांनी कला व संस्कृती, नागरी पुरवठा, ग्रामीण विकास, पंचायत व इतर महत्त्वाच्या खात्यांमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. काही काळ ते तुरुंग महानिरीक्षकही होते. गोमेकॉत प्रशासन विभागाचे संचालक म्हणून तसेच सचिवालयात कार्मिक खात्यात तसेच सर्वसाधारण प्रशासन विभागात त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
१९८९ साली मे महिन्यात केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या सेवेत ते रुजू झाले. त्यानंतर ते २००३ साली एप्रिलमध्ये गोवा सरकारच्या प्रशासनात आले. सरकारी सेवेत त्यांनी ३५ वर्षे पूर्ण केली. लाघवी स्वभाव व नेहमीच सहकार्याची भावना यामुळे लोकांनी नेहमीच त्यांचा आदर केला. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये ते निवृत्त होणार होते. परंतु वर्षभर आधीच त्यांनी अचानक स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्या या निर्णयामागचे कारण मात्र समजू शकले नाही. काही वर्षांपूर्वी सरकारी सेवेत असलेल्या त्यांच्या बंधूनेही स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.