हिंमत असल्यास सुदीन ढवळीकरांनी निवडणूक लढवावी, विनय तेंडुलकर यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:08 PM2019-05-23T22:08:38+5:302019-05-23T22:09:02+5:30
चारपैकी तीन पोट निवडणुकात यश मिळविल्याने आक्रमक झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आणखी दोन काँग्रेसचे आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत, असा सूतोवाच करताना हा तर सुदीन ढवळीकरांचा पराभव, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मडगाव: चारपैकी तीन पोट निवडणुकात यश मिळविल्याने आक्रमक झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आणखी दोन काँग्रेसचे आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत, असा सूतोवाच करताना हा तर सुदीन ढवळीकरांचा पराभव, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हिंमत असल्यास ढवळीकरांनी आता निवडणूक लढवून बघावी. लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असे तेंडुलकर म्हणाले.
मगोच्या दोन आमदारांनी भाजपात उडी घेतल्यानंतर मगोचे सुदीन ढवळीकर यांनी गोव्यातील पोट निवडणुका आणि लोकसभा निवडणूक असा प्रतिष्ठेचा प्रश्र्न केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. शिरोडय़ातून त्यांचे बंधु दीपक ढवळीकर हे रिंगणात उतरले होते तर मांद्रेत त्यांनी जीत आरोलकर या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र त्यांचा एकही उमेदवार जिंकून येऊ शकला नाही. दीपक ढवळीकर यांना 76 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना तेंडुलकर म्हणाले, शिरोड्यातील मतदार आमिषाला भुलले नाहीत, त्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय झाला. भाजप उमेदवाराचा पराभव व्हावा यासाठी विरोधकांनी या मतदारसंघात पाण्यासारखा पैसा ओतला होता. मात्र या आमिषाला मतदार भुलले नाहीत, असे ते म्हणाले. चारपैकी तीन पोट निवडणुकीत भाजपाला विजय मिळाल्याने सरकारला स्थैर्य आले आहे. आणखी दोन काँग्रेसचे आमदार भाजपात येऊ पहातात असे सूतोवाच करतानाच मात्र त्या बद्दलचा निर्णय घटक पक्षांना विश्र्वासात घेऊनच आम्ही घेऊ असे ते म्हणाले.