सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 07:26 PM2019-03-27T19:26:25+5:302019-03-27T19:26:52+5:30
सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता.
पणजी : सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. मगोपचे नेते असलेले मंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्याचे पालन केले नाही. यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा लागला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले.
सचिवालयात पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले की, शिरोड्यात मगोपने विधानसभेची पोटनिवडणूक लढवू नये असे ठरले होते. भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांच्यासोबत मगो नेत्यांची चर्चा झाली होती. मी स्वत:ही सुदिन ढवळीकर यांच्याशी बोललो होतो. मात्र ते ऐकले नाहीत. शेवटी राज्याचे हित महत्त्वाचे असते, भावाचे हित नव्हे.
सावंत म्हणाले, की आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर घडत असते. मगोपने हा कार्यक्रम पाळला नाही. फॉर्म्युला मानला नाही. शिरोडा मतदारसंघात मगोपने उमेदवार उभे करणे ही पूर्णपणे त्या पक्षाची चूक आहे. आम्ही मगो पक्ष फोडला नाही. मगोपच्या दोघा आमदारांना मगोमध्ये असुरक्षित वाटू लागले. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांना प्रवेश दिला. कुणीही भाजपमध्ये येत असल्यास आम्ही स्वागत करू.
काँग्रेसचे कुणी आमदार भाजपामध्ये येऊ पाहत आहेत काय, असे पत्रकारांनी विचारले असता, आम्ही तसे काही ऐकलेले नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मगोपने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याविषयी काय वाटते, असे विचारताच सावंत म्हणाले, की मगोपच्या निर्णयाचा भाजपवर काही परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहता, लोकसभेच्या गोव्यातील दोन जागा आणि पोटनिवडणुकीवेळी विधानसभेच्या तिन्ही जागा भाजपा जिंकेल.