दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा: जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर
By किशोर कुबल | Published: April 5, 2024 03:10 PM2024-04-05T15:10:01+5:302024-04-05T15:10:38+5:30
चिंतेचे कारण नाही ; कालव्यांचे पाणी १५ मे पासून बंद करणार
किशोर कुबल, पणजी : राज्यातील धरणांमध्ये पुढील दोन महिने पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा असून चिंतेचे कारण नाही, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले. कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मे पासून बंद केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना शिरोडकर म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. साळावली धरणात ११,७८५ हेक्टर मिटर पाणी असून ते पुढील १३० दिवस पुरेल एवढे आहे. या धरणातून आम्ही रोज ९० हेक्टर मीटर पाणी घेतो. त्या हिशोबाने १३० दिवस पाणी पुरेल एवढे पाणी या धरणात आहे. तिळारी धरणात १२,५६७ हेक्टर मीटर पाणी असून या धरणातून रोज १५६ हेक्टर मीटर पाणी आम्ही घेतो. त्यामुळे पुढील १४४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात आहे. चापोली धरणात ४६० दिवस पुरे एवढा पाणीसाठा आहे.
तिथे जास्त पाणी वापरले जात नाही. अंजुणे धरणात ७० दिवस पुरेल एवढे पाणी आहे. आमठाणे धरणात पंपिंग स्टेशन असल्याने कमी जास्त प्रमाणात पाणी असते. ही सर्व स्थिती पाहता पुढील दोन महिने उलटूनही दहा ते पंधरा दिवस पाणी पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडला तरी चिंतेचे कारण नाही, असा दावा शिरोडकर यांनी केला.
ते म्हणाले की' पंचवाडी धरणात १२७ दिवस पुरेल एवढे पाणी आहे या धरणातून रोज ५ ते ८ एमएलडी पाणी घेतले जाते. तेथे १७६ हेक्टर मीटर पाणी आहे. गेल्या वर्षी २४ जून पर्यंत पंचवाडी धरण क्षेत्रात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे हे धरण आटले होते. परंतु यंदा स्थिती समाधानकारक आहे.
कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मे पासून पाणी बंद करणार
अंजुणे किंवा इतर धरणांमधून भात शेतीसाठी कालव्यांद्वारे सिंचनासाठी दिले जाणारे पाणी हळूहळू कमी करून १५ मे रोजी बंद केले जाईल. या हंगामधील भात शेतीची कापणी साधारणपणे २० ते ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होते त्यामुळे पुढे शेतकऱ्यांना पाणी लागत नाही. १५ मेपर्यंत कालव्याचे पाणी बंद केले जाईल., असे शिरोडकर यांनी सांगितले.