भाजप जाहीरनाम्यासाठी गोव्यात ५० हजार लोकांकडून मागवल्या सूचना
By वासुदेव.पागी | Published: March 2, 2024 03:35 PM2024-03-02T15:35:57+5:302024-03-02T15:36:25+5:30
संकल्पपत्र रथयात्रेच्या शुभारंभावेळी भाजपची घोषणा
पणजी : भारतीय जनता पक्षाची देश्यापी संकल्प पत्र रथयात्रेची गोव्यातही सुरूवात झाली आहे. १५ मार्च पर्यंत मतदारांकडून सूचना मागवून नंतर त्या सूचनांच्या आधारे पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा बनविला जाणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे यांनी दिली. जाहीरनाम्यासाठी गोव्यातून किमान ५० हजार लोकांकडून सूचना पाठविण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला.
जाहीरनामा बनविण्यापूर्वी लोकांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेऊन लोकांच्या मागणीनुसार जाहीरनामा बनविण्यात येणार आहे. त्यासाठी संक्पपत्र रथयात्रेचे आयोजन देशभर करण्यात आले आहे. गोव्यात रथयात्रेचे निमंत्रक हे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना बनविण्यात आले असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रा होणार आहे असे तनावडे यांनी सांगितले. संकल्प पत्र रथ राज्याच्या सर्व मतदरसंघांतून फिरणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील लोकांकडून जाहीरनाम्याबाबतच्या काय अपेक्षा आहेत त्या समजून घ्यावा आणि त्या अनुशंगाने लोकांकडून सूचना मागवाव्यात असा हा यात्रेमागील उद्देश आहे. रथयात्रेच्या नियोजनानुसार लोकांना एक कार्ड देण्यात येत आहे. लोकांनी त्यावर आपल्या सूचना लिहायच्या आहेत. या सूचना केंद्राकडे पाठविल्या जाणार आहेत. लोक नमो या मोबाईल अँपवरूनही सूचना पाठवू शकतात. गोव्यातून ५० हजार सूचनांची अपेक्षा आहे असे तानावडे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सर्वानंद भगत व इतर नेते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यावेळी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही संकल्पयात्रा व्हँनला झेंडा दाखवून शुभारंभ केला. पणजीत शुभारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात मडगाव येथून यात्रेच्या कामाची सुरूवात होणार आहे.