सुलेमानचा पाय आणखी खोलात; शस्त्रास्त्र कायद्याखाली आणखी एक गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 10:40 IST2024-12-27T10:39:53+5:302024-12-27T10:40:53+5:30
त्यावरून हा गुन्हा नोंद झालेला आहे.

सुलेमानचा पाय आणखी खोलात; शस्त्रास्त्र कायद्याखाली आणखी एक गुन्हा नोंद
पणजी: सुलेमानविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याखाली आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे. त्याला कोठडीतून पळून जाण्यास मदत करणारा बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक यांच्या जबानीवरुन हा गुन्हा काल नोंद करण्यात आला. त्यामुळे सुलेमान आणखी अडचणीत सापडला आहे. सुलेमान व हजरत अली या दोघांनी आपल्याला बंदूक दाखवून धमकावल्याची जबानी अमित नाईक याने जुने गोवे पोलिसांना दिली आहे. त्यावरून हा गुन्हा नोंद झालेला आहे.
सध्या सुलेमान खान (५०) याची तब्येत बिघडल्याने त्याला गुरुवारी उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोमवारीच सुलेमानला पणजी न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली होती. एसआयटीने त्याला सर्वप्रथम १२ नोव्हेंबर २०२४ रोजी भू-बळकाव प्रकरणात अटक केली होती. चौकशीनंतर इतर काही गुन्हे देखील सुलेमानवर नोंद करण्यात आले होते. या प्रकरणात त्याला ३० दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दरम्यान, १३ डिसेंबर २०२४ रोजी सुलेमान आयआरबीचा बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याच्या मदतीने पोलिस कोठडीतून पसार झाला. त्यानंतर जवळपास ९ दिवसांनी केरळ पोलिसांच्या मदतीने सुलेमानला पुन्हा अटक करुन २३ रोजी राज्यात आणले होते. सध्या सुलेमानवर बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईक याला होन्नावर कुमठा येथे पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याने आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.