चौथ्या दिवशीही सूर्य ढगाआडच!
By Admin | Published: June 29, 2016 02:47 AM2016-06-29T02:47:46+5:302016-06-29T02:47:46+5:30
पणजी : गेले चार दिवस आकाश पावसाळी ढगांनी व्यापून राहिल्यामुळे गोव्यात सलग चौथ्या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही. सातत्याने
पणजी : गेले चार दिवस आकाश पावसाळी ढगांनी व्यापून राहिल्यामुळे गोव्यात सलग चौथ्या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही. सातत्याने पडणारा पाऊस मंगळवारी जोरदार बरसल्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती दिसत होती. येत्या २४ तासांतही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दिवसभर पाऊस पडूनही आकाशात दाटलेले काळे ढग कायम राहिल्यामुळे राज्यात सूर्यदर्शन होऊ शकले नाही. सोसाट्याचा वारा नसल्यामुळे संथगतीने पाऊस पडत असल्यामुळे आभाळात झालेली ढगांची दाटी विरळ होण्याची क्रिया घडत नाही. त्यामुळे आकाश कायम झाकोळलेले राहिले, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. येत्या काही दिवसांतही या वातावरणात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
दरम्यान, पणजीत सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत २ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात २४ तासांत सरासरी साडेचार इंच पाऊस पडल्याचा खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्ण आकडेवारी खात्याकडून बुधवारी जारी केली जाईल. नेहमीप्रमाणे मुरगाव, दाबोळी व पेडणेत जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. तसेच मुरगावपाठोपाठ दाबोळीतही पावसाने इंचांची पन्नाशी ओलांडली आहे.
मान्सूसाठी अत्यंत पोषक वातावरण अरबी समुद्रात असल्यामुळे पुढील २४ तासांत जोरदार वृष्टी होणार आहे. किनारी भागात अधिक पाऊस पडत आहे. पावसाला वाऱ्याची साथ नसल्यामुळे मच्छीमारांना विशेष सूचना देण्यात आलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)