‘सनबर्न’चा गोव्याला रामराम
By किशोर कुबल | Published: January 4, 2024 02:14 PM2024-01-04T14:14:12+5:302024-01-04T14:14:36+5:30
इयर एंडला गोव्यात होणारा ‘सनबर्न’ ईडीएम यापुढे होणार नाही.
किशोर कुबल, पणजी : इयर एंडला गोव्यात होणारा ‘सनबर्न’ ईडीएम यापुढे होणार नाही. आयोजक हरिंदर सिंग यांनी सोशल मिडियावर पोस्ट टाकून अलीकडेच गोव्यात झालेला ‘सनबर्न’ ईडीएम हा अखेरचा होता व हे जाहीर करण्यात आपल्याला खेद होत दु:ख होत असल्याचे म्हटले आहे.
वागातोर किनाय्रावर दरवर्षी डिसेंबरअखेर होणाय्रा या इलेक्टॅानिक डान्स फेस्टिव्हलला देश, विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असे. तिकीट बूकिंग पाच ते सहा महिने आधीच चालायचे. सुरवातीच्या काळात पहाटेपर्यंत हा ईडीएम चालायचा परंतु त्याला ड्रग्स, नशेचे गालबोट लागले. ड्र्स सेवनाने युवकांचे बळी जाऊ लागले त्यामुळे हा ईडीएम बदनाम झाला.
२०१९ साली या ईडीएममध्ये ड्रग्सच्या अतिसेवनाने आंध्र प्रदेशचे दोन युवक साईप्रसाद मालायला व व्यंकट सत्यनारायण आणि बंगळुरुचा २४ वर्षीय तरुण संजीव कोट्टा हे मृत्युमुखी पडले होते. त्याआधीही या ईडीएमध्ये ड्रग्स सेवनामुळे मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली होती.
सरत्या वर्षात अनेक निर्बंध ‘सनबर्न’वर घालण्यात आले. सरकारी आदेशावरुन पोलिसांनी हस्तक्षेप करुन रात्री १० वाजताच संगीत बंद केले. या ईडीएममुळे वागातोर, हणजुण आदी भागातील किनारी रस्ते वाहतुक कोंडी होऊन तुंबत असत. तसेच शॅकवाले व स्थानिक रेस्टॉरण्टसना ग्राहक मिळत नसत त्यामुळे थर्टी फर्स्टला सनबर्न नकोच अशी भूमिका स्थानिक आमदारांनी घेतली व त्यानुसार २८ ते ३० डिसेंबर असे तीन दिवसच तो चालला. यंदा पर्यटकांची संख्याही या ईडीएमला कमीच होती.