सनबर्न फेस्टिव्हल: किडनीला इजा झाल्याने करण कश्यपचा मृत्यू? व्हिसेरा चाचणीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2024 07:46 IST2024-12-31T07:46:29+5:302024-12-31T07:46:29+5:30
करण याच्या मृतदेहाची गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

सनबर्न फेस्टिव्हल: किडनीला इजा झाल्याने करण कश्यपचा मृत्यू? व्हिसेरा चाचणीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धारगळ येथे झालेल्या सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दिल्ली येथील करण राजू कश्यप याच्या किडनीला इजा झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालातून काढण्यात आला आहे. करण याच्या मृतदेहाची गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
या शवचिकित्सा अहवालानुसार, करण याच्या मूत्रपिंडाला इजा झाली होती. परंतु, केवळ त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष अहवालात दिलेला नाही. मृत्यूचे कारण राखून ठेवण्यात आले आहे. त्याच्या 'व्हिसेरा' चाचणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे अहवालात म्हटले आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत याची अधिक पडताळणी होणार आहे.
कश्यप हा सनबर्न पार्टीत सहभागी झाला होता. नंतर त्याला नाश्ता करताना अस्वस्थ वाटले होते आणि तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्याला मापसा येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आधी जागेच्या कारणावरून वादात सापलेल्या सनबर्न ईडीएम महोत्सवादरम्यान शनिवारी पहिल्याच हा प्रकार घडला. रविवारी या तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच खळबळ उडाली होती. किडनीला इजा झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.