मनमोहन सिंग यांच्या निधनाचा दुखवटा धाब्यावर; आजपासून सनबर्न, धारगळला ३ दिवस चालणार धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 09:00 IST2024-12-28T09:00:47+5:302024-12-28T09:00:47+5:30
धारगळ येथे पुढील तीन दिवस लाखो पर्यटक उपस्थिती लावणार आहेत. सलग तीन दिवस संगीत चालणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डीजे, बॅण्ड असतील. देशभर दुखवटा असताना देशीविदेशी पर्यटकांचा धिंगाणा सनबर्नमध्ये असणार आहे.

मनमोहन सिंग यांच्या निधनाचा दुखवटा धाब्यावर; आजपासून सनबर्न, धारगळला ३ दिवस चालणार धिंगाणा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राज्य सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला असतानाही आज (दि. २८) पासून पुढील तीन दिवस धारगळ येथे सनबर्न ईडीएममध्ये धिंगाणा चालणार आहे. आयोजक ही खासगी कंपनी असली तरी, सरकारने भक्कम पाठिंबा दिला आहे. यामुळे स्थानिक पंचायतीचाही पूर्वीच नाईलाज झालेला आहे.
धारगळ येथील ईडीएमला पुढील तीन दिवस लाखो पर्यटक उपस्थिती लावणार आहेत. सलग तीन दिवस संगीत चालणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डीजे, बॅण्ड असतील. देशभर दुखवटा असताना देशीविदेशी पर्यटकांचा धिंगाणा सनबर्नमध्ये असणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी दुखवट्यात कसली मौजमजा?, असा सवाल करुन सरकारलाही याचे मुळीच भान नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. खलप म्हणाले की,' मनमोहन सिंग यांनी भारताला जगाच्या आर्थिक महासत्तेकडे नेण्याच्या मार्गावर नेऊन ठेवले. ते दोन वेळा पंतप्रधान बनले याचे भान तरी असायला हवे.'
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर संताप व्यक्त करत म्हणाले की, सरकार केवळ पैशाच्या मागे धावत असून लूट चालली आहे. म. गांधी जयंतीदिनी कॅसिनो चालू ठेवणाऱ्या भाजप सरकारकडून आणखी कोणती अपेक्षा करावी? गोव्याचे एकंदरीत सांस्कृतिक वातावरणच नष्ट होत चालले आहे.'
दरम्यान, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना सनबर्न होणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, सनबर्नला ज्यांनी परवानगी दिली त्यांना तुम्ही विचारा. सरकारने सनबर्नला तत्त्वतः मान्यता दिलेली आहे एवढेच मला ठाऊक आहे. मी दोन दिवस गोव्यात नव्हतो.'
प्राप्त माहितीनुसार पर्यटन खात्याने सनबर्न आयोजकांकडून सुरक्षा ठेव म्हणून १.९ कोटी रुपये शुल्क लावलेले आहे. हे शुल्क परतावा मिळणारे आहे. २.३ कोटी रुपये अन्य शुल्क आहे. सर्व संबंधित खात्यांकडून परवाने घेण्याची अट आयोजकांना घातली आहे. तसेच कोर्टानेही काही अटी घालूनच परवानगी दिलेली आहे. धारगळमध्ये एका गटाचा सनबर्नला विरोध आहे. आज प्रत्यक्षात तो सुरु होईल तेव्हा तो रोखण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.