सदानंद तानावडेंच्या मनाविरुद्ध जात कामुर्लीत सनबर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 10:17 AM2024-09-26T10:17:48+5:302024-09-26T10:18:37+5:30

हळर्णकरांची कसोटी; खंवटेंच्या भूमिकेकडे लक्ष

sunburn in kamurli going against the will of sadanand tanavade | सदानंद तानावडेंच्या मनाविरुद्ध जात कामुर्लीत सनबर्न

सदानंद तानावडेंच्या मनाविरुद्ध जात कामुर्लीत सनबर्न

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सनबर्न महोत्सव थिवी मतदारसंघातील कामुर्ली येथे येऊ घातल्याचे निश्चित झाले आहे. आयोजकांनी कोमुनिदादकडे जागाही मागितली आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे आमदार तथा पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची या प्रश्नावर कसोटी लागणार आहे. तर मंत्री रोहन खंवटे यांच्या भूमिकेकडेही थिवीवासियांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या मनाविरुद्ध कामुर्लीत सनबर्नचा घाट घालण्यात येत असल्याची चर्चा आहे. 

सनबर्न आतापर्यंत शिवोली मतदारसंघातील वागातोर येथे होत असे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तीन दिवस चालणाऱ्या या ईडीएममध्ये देश, विदेशातून पर्यटक लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावत असतात. हा ईडीएम ड्रग्स सेवनामुळे बदनाम झालेला आहे. यापूर्वी अति ड्रग्स सेवनाने या ईडीएममध्ये मृत्यू होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे हे थिवीचे माजी आमदार आहेत. त्यांना थिवीत सनबर्नचा विषाणू येणे आवडणार नाही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र गोवा सरकार भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मनाविरुद्ध जात कामुलींत सनबर्न करू पाहते. यासाठी काहीजणांनी कोमुनिदादला पुढे काढले आहे.

दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी कामुर्ली कोमुनिदादने बैठक बोलावली असून त्यात सनबर्न आयोजकांच्या या प्रस्तावावर विचार विनिमय होणार आहे. आयोजकांनी उत्तर गोवा कोमुनिदादकडे प्रस्ताव पाठवला होता. तेथून त्यांनी तो कामुर्ती कोमुनिदादकडे पाठवला.

आयोजकांचे जागेसाठी हेलपाटे 

दक्षिण गोव्यात आमदार, लोकप्रतिनिधी व जनतेकडून प्रचंड विरोध झाल्याने आयोजकांना विचार बदलावा लागला. वेर्णा येथे औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीची चाचपणीही आयोजकांनी केली होती. तसेच बेतुल येथेही सनबर्न करण्याचा प्रस्ताव होता. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दक्षिण गोव्यात तो होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. मंत्री माविन गुदिन्हो, अपक्ष आमदार आंतोन वास यांनीही आपला विरोध दर्शवला होता. तिघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
 

Web Title: sunburn in kamurli going against the will of sadanand tanavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.