"गोव्यात सनबर्नला सायंकाळी ६ नंतर परवानगी नको, तारीखही बदला"
By किशोर कुबल | Published: November 28, 2023 01:28 PM2023-11-28T13:28:40+5:302023-11-28T13:29:35+5:30
सरकारने २८ ते ३१ डिसेंबरऐवजी अन्य तारीख सनबर्नला द्यावी किंवा सायंकाळी ६ नंतर मनाई करावी.
किशोर कुबल/पणजी
पणजी : सत्तधारी आमदार मायकल लोबो यांची री ओढताना आपचेगोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनीही सरकारने सनबर्नची तारीख बदलावी किंवा सायंकाळी ६ नंतर परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. पालेकर म्हणाले की, सरकारने शॅक वितरणास आधीच विलंब केल्याने व्यावसायिकांचा धंदा बुडाला. वर्ष अखेरीस पर्यटकांची गोव्यात गर्दी असते. परंतु त्याच वेळी सनबर्नचे आयोजन केले जात असल्याने पर्यटक तेथे वळतात व शॅकवाल्यांना ग्राहक मिळत नाहीत. सरकारने २८ ते ३१ डिसेंबरऐवजी अन्य तारीख सनबर्नला द्यावी किंवा सायंकाळी ६ नंतर मनाई करावी.
पालेकर म्हणाले कि, सनबर्नवाले कमावून जातात परंतु गोमंतकीय शॅक व्यावसायिकांचा धंदा बुडतो. शिवाय सनबर्नमुळे वागातोर भागात गर्दी होते व लोक स्थानिक रेस्टॉरण्टसमध्ये जाणेही टाळतात.
दरम्यान, सत्ताधारी आमदार मायकल लोबोही यांनीही सायंकाळी ८ नंतर सनबर्नला परवानगी देऊ नये अशी मागणी केलेली आहे.
सनबर्न ईडीएम उत्तर गोव्यात वागातोर किनारी दरवर्षी होत असतो. देश विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने या ईडीएमला उपस्थिती लावतात. यापूर्वी अतिप्रमाणात ड्रग्स सेवन करुन मृत्यूमुखी पडण्याचे प्रकारही या ईडीएममध्ये घडलेले आहेत. कंपनीने या ईडीएमसाठी बूकिंग सुरु केले आहे.