गोव्यात ईडीएमसाठी सनबर्नचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:53 PM2018-12-13T12:53:31+5:302018-12-13T13:00:16+5:30
नववर्ष स्वागतासाठी गोव्यात चालू महिनाअखेरीस इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी सनबर्न कंपनीने सरकारकडे संपर्क साधलेला आहे.
पणजी : नववर्ष स्वागतासाठी गोव्यात चालू महिनाअखेरीस इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी सनबर्न कंपनीने सरकारकडे संपर्क साधलेला आहे. परंतु आधी थकबाकीची रक्कम भरा, नंतर विचार करू, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. गेल्या वर्षी गोव्यात ईडीएम होऊ शकला नाही. पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सनबर्नकडून प्रस्ताव आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. सनबर्न आणि सुपरसोनिक कंपन्यांकडून २0१२-१३ पासूनची सुमारे ८.५ कोटी रुपयांची थकबाकी सरकारला येणे आहे. आजगांवकर म्हणाले की, ‘ ही थकबाकी आधी सरकारला मिळायला हवी.
सनबर्न किंवा अन्य कंपन्यांनी अर्ज करावेत. थकबाकी भरल्यास विचार करता येईल. परंतु वर्षअखेरीस नव्हे तर फेब्रुवारी दरम्यान अशा महोत्सवाचे आयोजन करता येईल.’ आजगांवकर पुढे म्हणाले की, ‘अधिकाधिक पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी अशा संगीत महोत्सवांची गरज आहे. डिसेंबरमध्ये एरव्हीच पर्यटकांची गर्दी असते त्यामुळे हॉटेलांच्या खोल्याही फुल्ल असतात. शिवाय वाहतूक कोंडीचेही प्रकार घडतात.’
इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हलसाठी वर्षअखेर पर्यटक मोठ्या संख्येने हजरी लावतात. कांदोळी, वागातोरसारख्या किनाºयांवर हे फेस्टिव्हल व्हायचे तेव्हा वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असे आणि त्याचा उपद्रव स्थानिकांनाही होत असे. त्यामुळे अशा प्रकारच्या महोत्सवांना स्थानिकांचा विरोध आहे. शिवाय याआधी अशा ईडीएममध्ये मादक पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू होण्याचे प्रकारही घडलेले आहेत त्यामुळे एनजीओंचाही विरोध आहे.
सनबर्न आणि सुपरसोनिक कंपन्यांच्या थकबाकीबद्दल विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनीही विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.