तिलारीतून डिसेंबरात पुरवठा सुरु - सुशांत नाडकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 07:03 PM2018-10-30T19:03:39+5:302018-10-30T19:03:53+5:30
डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली.
म्हापसा - डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली.
तिलारी धरणातून गोव्यात पाणी पुरवठा सुरु करण्यापूर्वी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. दर वर्षी पावसाळा संपल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाते; पण या वर्षी दुरुस्तीवर अद्याप निर्णय झाला नसल्याने नाडकर्णी म्हणाले. गरज पडल्यास कालव्याच्या दुरुस्तीचे काम योग्य निरीक्षणानंतर हाती घेतले जाणार आहे. तोपर्यंत काही अंशी पुरवठा सुरु ठेवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने पुरवठा सुरु केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात तिलारीच्या पाण्याचा वापर जास्त प्रमाणावर पिण्यासाठी होत असल्याचे त्यांच्या नजरेला आणून दिले असता या पाण्याचा वापर जास्तीत जास्त पिण्यासाठी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तिलारी पाण्याचा वापर जास्त प्रमाणावर पिण्यासाठी करण्यावर प्राधान्य दिले जाणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर कृषीसाठी या पाण्याचा वापर केला जाणार आहे. ज्या वेळी तिलारीतून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला त्यावेळी १६,९७८ हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यात आलेली; पण आता हे प्रमाण कमी होवून १४,५२१ हेक्टर जमीन ओलीताखाली असल्याचे ते म्हणाले. जमीन ओलिताखाली येण्याचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्यासाठी वापर करण्यात येत असला तरी कृषीच्या वापरावर त्याचे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर गोव्यातील काही भागात शेतक-यांसाठी बांधण्यात आलेले कालवे वापराविना असल्याने ते नादुरुस्त झाल्याचे त्यांच्या निदर्शनाला आणून दिले असता अशा भागातील कालवे पुन्हा दुरुस्त करुन त्याचा पुर्नवापर केला जाणार असल्याची माहिती दिली. प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयातून हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लक्ष ठेवले जात असल्याने कुठल्याही परिस्थितीत डिसेंबर २०१९ पर्यंत प्रकल्पाशी संबंधीत सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नाडकर्णी यांनी दिली.