इफ्फीतून दोन सिनेमे वगळण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 05:48 PM2017-11-15T17:48:30+5:302017-11-15T17:48:58+5:30
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) न्यूड आणि एस. दुर्गा हे दोन चित्रपट वगळण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी समर्थन केले.
पणजी : गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) न्यूड आणि एस. दुर्गा हे दोन चित्रपट वगळण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी समर्थन केले.
येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना न्यड व अन्य सिनेमा का वगळण्यात आला आहे हे विचारले. पर्रीकर म्हणाले की, आपण या प्रकरणी चौकशी करून घेतली आहे. न्यूड हा मराठी सिनेमा पूर्ण झालेला नसल्याने त्याला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यामुळे ज्यूरी मंडळाने निवडून देखील इंडियन पॅनोरमामधून तो वगळण्यात आला असल्याची माहिती आपणास गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षांनी दिली आहे.
पर्रीकर म्हणाले की, कोणताच सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राशिवाय इफ्फीत दाखविता येत नाही. दुर्गा हा सिनेमा केरळ आणि अन्य दोन ठिकाणी दाखविण्यात आला आहे पण तिथे तो कट लावून म्हणजेच काही दृश्ये वगळून दाखविण्यात आला. समाजात तेढ निर्माण होऊ नये या हेतूने कट लावणे गरजेचे ठरले होते. गोव्यात इफ्फीमध्ये तो दाखविण्यासाठी कट न लावताच मंजुर केला गेला होता. त्यामुळे आता तो वगळण्यात आला. केंद्र सरकारने स्वतःच्या अधिकारांनुसार हा निर्णय घेतला असावा असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांच्या एका चित्रपटाला काही वर्षांपूर्वी इफ्फीमध्ये दाखविण्यात अडचण निर्माण झाली होती. कारण त्याना सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले नव्हते. त्यावेळी आपण सेन्सॉर बोर्डच्या तत्कालीन अध्यक्ष शर्मिला टागोर यांच्याशी बोलून तालक यांच्या सिनेमासाठी सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या दृष्टीने विनंती केली होती. ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच आम्ही इफ्फीत त्यांचा सिनेमा दाखवू शकलो होतो. न्यूड सिनेमा तर अजून पूर्णच झालेला नाही.
काही जण उगाच वाद निर्माण करत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.