चिंबल ग्रामसभेत म्हादईला पाठिंबा; जलस्रोत नष्ट होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:04 PM2023-02-14T13:04:18+5:302023-02-14T13:05:03+5:30
म्हादईच्या रक्षणार्थ राज्यातील विविध पंचायतींकडून पाठिंबा वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईच्या रक्षणार्थ राज्यातील विविध पंचायतींकडून पाठिंबा वाढत आहे. रविवार, दि. १२ रोजी झालेल्या चिंबलच्या ग्रामसभेतही चिंबलवासीयांनी वाचवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. या विषयाची गंभीरता लक्षात घेता रविवार, दि. १९ रोजी सकाळी १०:३० वाजता पुन्हा एकदा ग्रामसभेत चर्चा करून ठराव घेण्याचा निर्णय झाला.
चिंबलच्या ग्रामसभेत यावेळी एनआयओचे वैज्ञानिक डॉ. अनिल यांनी उपस्थित राहून गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. यावेळी सरपंच संदेश शिरोडकर यांनीसुद्धा ग्रामस्थांना म्हादईला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.
..तर पाण्याच्या खारटपणावर प्रभाव
वैज्ञानिक डॉ. अनिल म्हणाले की, म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवले तर मांडवी नदीच्या पाण्याच्या खारटपणावर त्याचा प्रभाव पडेल व त्याचा थेट पश्चिम घाटातील वन्यजीव, वनक्षेत्र, लोकांच्या जीवनमानावर परिणाम होईल. जागतिक तापमान वाढीमुळे यापूर्वीच नदी, ताले, विहिरी आटत आहेत. जर म्हादईचे पाणी वळवले तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल. म्हादईचे महत्त्व जाणा, असे आवाहन त्यांनी केले.
खांडेपार नदीवरही परिणाम : कुंकळ्येकर
ग्रामस्थ तुकाराम कुंकळ्येकर म्हणाले की, चिंबल तसेच संपूर्ण तिसवाडी तालुक्याला ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर प्रकल्प हा खांडेपार नदीतून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. खांडेपार नदी ही म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवले तर खांडेपार नदीही आटण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तिसवाडी तालुक्यात निर्माण होणाऱ्या स्थितीची कल्पना न केलेली बरीच असे त्यांनी नमूद केले.
विहिरीही आटण्याच्या मार्गावर
चिबल मंचचे गुरुदास शिरोडकर म्हणाले की, चिंबल गावात प्रत्येक प्रभागात विहिरी आहेत. मात्र त्यापैकी अनेक विहिरी आटण्याच्या मार्गावर आहेत. चिंबल येथे वडाचीबाय म्हणून विहीर असून, जेव्हा कधी गावातील नळांना पाणीपुरवठा होत नाही, तेव्हा लोक या विहिरीतील पाण्यावर अवलंबून असतात. सदर विहीर संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करते, असे त्यांनी सांगितले."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"