गोव्याच्या खनिज निर्यातीसाठी आश्वासक चित्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १३ टक्क्यांनी दर वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 02:39 PM2017-12-10T14:39:35+5:302017-12-10T14:39:43+5:30
गोव्यातील खनिजाची निर्यात गेल्या दोन महिन्यात घटली असली तरी आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढल्याने आश्वासक चित्र निर्माण झाले आहे.
पणजी : गोव्यातील खनिजाची निर्यात गेल्या दोन महिन्यात घटली असली तरी आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढल्याने आश्वासक चित्र निर्माण झाले आहे. येथील कमी ग्रेडच्या लोह खनिजाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी घटल्याने निर्यातीवर त्याचा परिणाम झाला होता. या हंगामातील पहिल्या दोन महिन्यातच निर्यात सुमारे ७६ टक्क्यांनी घटल्याचे आढळून आले. खाण अभ्यासक अर्थतज्ञ राजेंद्र काकाडेकर यांच्या मतें आता चित्र पालटणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आठ-दहा दिवसांपूर्वीच खनिजाचे दर सरासरी १५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या नॅशनल मिनरल्स डेव्हलॉपमेंट कॉर्पोरेशननेही १३ टक्क्यांनी दर वाढवलेले आहेत. यामुळे गोव्याच्या कमी ग्रेडच्या खनिजालाही निर्यातीसाठी चांगले दिवस येतील.
काकोडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिजाला वाढीव दर मिळणार असल्याने आता खाण व्यावसायिकांनी ट्रकवाल्यांनाही दर वाढवून देता येतील. खनिज वाहतूक करणारे ट्रकमालकही त्यामुळे नव्या जोमाने काम करु शकतील.
गेल्या वर्षीच्या आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या तुलनेत निर्यात घटलेली आहे. गोवा खनिज निर्यातदार संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी वरील दोन महिन्यांच्या काळात निर्यात २0 लाख ८४ हजार टन इतकी होती. यावर्षी केवळ ६८ हजार टन निर्यात झालेली आहे. चीन व जपान या राष्ट्रांना उच्च प्रतीच्या खनिजाची गरज आहे ती गोव्याकडून पूर्ण होत नाही. गोव्यात मिळणारे खनिज हे ५८ ग्रेडच्या खालील असते.
सूत्रांच्या मते या खानिजाचा दर्जा वाढविला तरी निर्यात किफायतशील ठरणार नाही याचे कारण निर्यातीवर ३0 टक्के कर लागू झालेला आहे. संघटनेचे सचिव ग्लेन कलवंपरा म्हणाले की, या स्पर्धेत गोव्यातील खाण व्यावसायिक टिकायचे असतील कर तरी कमी झाला पाहिजे. यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करायला हवा, असे ते म्हणाले. ६0 टक्के ग्रेडपर्यंतच्या खनिजावरील निर्यात कर काढूनच टाकला पाहिजे, अशी खाण व्यावसायिकांची मागणी असून ती त्यांनी केंद्र सरकारकडेही मांडलेली आहे. गोव्यातील खनिज स्थानिक पोलाद उद्योगांसाठी उपयोगी नाही. आणि या उद्योगांनी ते खरेदी केले तरी वाहतूक खर्च एवढा होतो की, चीन किंवा जपानला निर्यात केल्यापेक्षाही तो कितीतरी पटीने अधिक होतो.
गोव्यातील खनिज निर्यातील आॅस्ट्रेलिया, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका, इराण, कॅनडा आदी राष्ट्रांची स्पर्धा निर्माण झाली आहे. २0१२ साली खाणी बंद पडण्याआधी राज्यातून ५0 दशलक्ष टनांपर्यंत खनिज निर्यात होत होती.