गोव्यातील ‘सिरीयल किलर’ महानंद नाईक याच्या जन्मठेपेवर सुप्रीम कोर्टाची मोहर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 06:36 PM2018-03-16T18:36:18+5:302018-03-16T18:40:16+5:30
गोव्यात तब्बल १६ युवतींच्या खून प्रकरणांमध्ये गाजलेल्या सिरीयल किलर महानंद नाईक याला फोंडा येथील वासंती गावडे खून प्रकरणात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी उचलून धरली.
पणजी : गोव्यात तब्बल १६ युवतींच्या खून प्रकरणांमध्ये गाजलेल्या सिरीयल किलर महानंद नाईक याला फोंडा येथील वासंती गावडे खून प्रकरणात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी उचलून धरली. आतापर्यंत तीन प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झालेली आहे तर चार प्रकरणांमध्ये तो निर्दोष सुटला आहे. एका प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. गोयल व न्यायमूर्ती यु. यु. ललित यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने वरील आदेश दिला. १९९५ ते २00९ या काळात तब्बल १६ युवतींचे खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. १९ ते २५ वयोगटातील तरुण मुलींना हेरुन मैत्री करुन लग्नाचे आमिष दाखविणे आणि नंतर त्यांचा उपभोग घेऊन खून करुन त्यांच्या अंगावरील दागिने पळविणे अशी त्याची गुन्ह्याची कार्यपद्धती होती. या मुलींचा दुपट्टा वापरुनच गळा आवळून तो खून करीत असे त्यामुळे ‘दुपट्टा कीलर’ म्हणून तो गाजला. १९९५ च्या वासंती गावडे खून प्रकरणात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने महानंद याला जन्मठेप तसेच १ लाख ३0 हजार रुपये दंड ठोठावली होती. महानंदने केलेला हा पहिला खून होता, असाही पोलिसांचा दावा आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशास महानंद याने हायकोर्टात आव्हान दिले असता हायकोर्टानेही आदेश उचलून धरला. या आदेशाविरुद्ध तो सर्वोच्च न्यायालयात गेला. वासंती हिचे प्रेत मिळालेच नाही, असा दावा करुन तो आपल्या सुटकेसाठी वेगवेगळे बचाव घेत होता परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याचा बचाव फेटाळून लावला.
महानंद याने ११ सप्टेंबर १९९५ रोजी बेतोडा येथे निर्जन स्थळी नेऊन वासंती हिचा तिचाच दुपट्टा वापरुन गळा आवळून खून केला आणि तिचे दागिने पळविले, असा आरोप त्याच्यावर आहे. महानंद हा त्या काळी फोंडा शहरात रिक्षा चालवत होता. वासंती हिच्याबरोबर महानंदला तिच्या मावस भावाने पाहिले होते. वासंती बेपत्ता झाल्यानंतर त्यानेच या प्रकरणाचा पाठपुरावा केला. या खुनाची कबुली तब्बल चौदा वर्षांनी ३ मे २00९ रोजी त्याने दिली. शेवटी पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात तो सापडला आणि त्याचे सर्व कारनामे उघड झाले. अपहरण, बळजबरी चोरी, खून तसेच पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणात त्याच्यावर भादंसंचे कलम ३0२, ३६४, ३९२ व २0१ खाली गुन्हे नोंद आहेत.
या प्रकरणाचे तपासकाम करणारे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील खटल्याच्या सुनावणीसाठी दिल्लीत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकरणात किमान २0 साक्षिदारांच्या जबान्या आम्ही घेतल्या. वासंती हिचे प्रेत सापडल्याने आमचा दावा मजबूत झाला होता. गोळा केलेले सर्व पुरावे व्यवस्थितपणे कनिष्ठ न्यायालयाला आम्ही सादर केले होते त्यामुळेच महानंद याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जन्मठेप ठोठावली. आता सर्वोच्च न्यायालयानेही ती उचलून धरल्याने आमचा तपास योग्य दिशेने होता यावर शिक्कामोर्तब झाले.
या खटल्यात राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, अॅड. साल्वादोर रिबेलो व अॅड. मयुरी गोयल यांनी काम पाहिले. तपास अधिकारी म्हणून पाटील यांच्यासह उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर हेही सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणात पुरेसे पुरावे तसेच घटना प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार नाही, असेही महानंद याचे म्हणणे होते. नाडकर्णी यांनी महानंद याचा गुन्हेगारी पूर्वतिहास पहावा, अशी विनंती केली. मावसभावाने महानंद याच्याबरोबर वासंती हिला प्रत्यक्ष पाहिले आहे. तशी त्याची जबानीही आहे याकडे लक्ष वेधले.