गोव्यात दहा पर्यटकांना बुडताना जीवरक्षकांनी वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 05:30 PM2017-12-23T17:30:59+5:302017-12-23T17:32:38+5:30
गोव्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू असून लाखो पर्यटक राज्यात दाखल झाले आहेत. नाताळ सण आणि नववर्ष साजरे करणं अशा दोन्ही हेतूंनी गोव्याकडे पर्यटकांचे पाय वळले आहेत. मात्र सागरकिना-यांवर उसळलेल्या गर्दीमध्ये काही दुर्घटनाही घडत आहेत.
पणजी : गोव्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू असून लाखो पर्यटक राज्यात दाखल झाले आहेत. नाताळ सण आणि नववर्ष साजरे करणं अशा दोन्ही हेतूंनी गोव्याकडे पर्यटकांचे पाय वळले आहेत. मात्र सागरकिना-यांवर उसळलेल्या गर्दीमध्ये काही दुर्घटनाही घडत आहेत. उत्तर गोव्यातील हरमळमधील समुद्रात दहा पर्यटक बुडत असताना शुक्रवारी (22 डिसेंबर) सायंकाळी उशीरा जीवरक्षकांनी या सर्व दहा पर्यटकांना वाचविण्याची घटना घडली. शनिवारी जीवरक्षक संस्थेने सगळी माहिती जाहीर केली आहे.
हरमळ किना-यावर 60 पर्यटकांचा एक गट होता. त्यापैकी एक दहा वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबीयांसोबत हरमळ समुद्रात उतरला. थोड्या वेळाने हा मुलगा गटांगळ्या खात असल्याचे पर्यटकांनी पाहिले. बाजूलाच पाच पुरुष पर्यटक पोहत होते. हा मुलगा बुडत असल्याचे त्यांनी पाहिले व ते मुलाला वाचविण्यासाठी खोल समुद्रात गेले. याचवेळी या मुलाच्या कुटुंबीयांनीदेखील ही स्थिती पाहिली. कुटुंबामधील एक पुरुष व तीन महिलांनी तिथे धाव घेतली व मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दहा वर्षीय मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणारे सर्व नऊ पर्यटक त्या मुलासह एका लाटेच्या तडाख्यात सापडले.
यावेळी जीवरक्षक रामकृष्ण शक्शेली याने ही स्थिती पाहिली व त्याने किना-यावरील टॉवरला संदेश दिला व जेटस्कीला बोलावले. समुद्रात 50 मीटर पोहत जाऊन जीवरक्षकाने सर्व दहा पर्यटकांना गाठले. यावेळी जीवरक्षक मनोज परब व दत्तराज कोरगावकर यांनीही तिथे धाव घेतली. या तिन्ही जीवरक्षकांनी सर्व दहा पर्यटकांना बुडताना वाचवले व किना-यावर आणले. या दहापैकी आठजणांना श्वासोश्वास करताना त्रस होत होता. इतरांची स्थिती ठिक होती. त्यामुळे 108 रुग्णवाहिका बोलविण्यात आली. रुग्णवाहिकेमधून दोघांना तुयें येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. दोघांपैकी एकावर प्राथमिक उपचार करून त्यास आरोग्य केंद्रामधून जाऊ देण्यात आले. दुस-या पर्यटकाला पुढील उपचारांसाठी म्हापसा येथील इस्पितळात नेण्यात आले. ही सगळी माहिती दृष्टी जीवरक्षक संस्थेने शनिवारी येथे जाहीर केली.
दरम्यान, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी दोन दिवसांपूर्वीच पर्यटन खात्याचे अधिकारी व राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन किनारपट्टीवरील सुरक्षेचा आढावा घेतला होता. किना-यांवर सध्या अनेक जीवरक्षक तैनात आहेत.