म्हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुशांत हरमलकर; माजी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला
By काशिराम म्हांबरे | Published: March 5, 2024 02:58 PM2024-03-05T14:58:39+5:302024-03-05T14:59:45+5:30
उद्या ६ मार्च रोजी उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. माजी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
म्हापसा: काशिराम म्हांबरे
म्हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुशांत हरमलकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे या पदासाठी त्यांची निवड निश्चित मानली जाते. उद्या ६ मार्च रोजी उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. माजी उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी विरोधी गटाकडूनही अर्ज दाखल होण्याची संभावना व्यक्त केली जात होती मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्याने सुशांत हरमलकर यांची बिनविरोध निवड केली जाणार आहे.
सत्ताधारी गटात झालेल्या करारानुसार फडके यांनी २१ फेब्रूवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा पालिका प्रशासन संचालनालयकडे सादर केला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. विराज फडके यांची गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. सुमारे वर्षभर या पदी राहिल्यानंतर सत्ताधारी गटात झालेल्या अलिखित करारानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
नव्या उपनगराध्यक्षांची निवड करण्यासाठी पालिका मंडळाची विशेष बैठक उद्या पालिकेच्या सभागृहात सकाळी संपन्न होणार आहे. त्यावेळी त्यांची अधिकृत रित्या निवड केली जाणार आहे. अर्ज सादर करताना हरमलकर यांच्यासोबत उपसभापती जोशूआ डिसोजा, नगराध्यक्षा डॉ. नूतन बीचोलकर तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.