गोव्यात कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 09:15 PM2020-01-28T21:15:15+5:302020-01-28T21:15:22+5:30

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण राज्यात आढळला असून, त्याला गोमेकॉमध्ये स्वतंत्र वॉर्डमध्ये निगराणीखाली ठेवले आहे.

A suspected patient of corona virus in Goa | गोव्यात कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण 

गोव्यात कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण 

Next

पणजी : चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण राज्यात आढळला असून, त्याला गोमेकॉमध्ये स्वतंत्र वॉर्डमध्ये निगराणीखाली ठेवले आहे. सात दिवसांपूर्वी चीनहून दिल्लीमार्गे गोव्यात आला होता. आरोग्य खात्याने स्थापन केलेल्या कृती दलाची बैठक या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी झाली व दाबोळी विमानतळावर थर्मल स्कॅनर बसविण्याची विनंती केंद्राकडे करण्यात आली. संशयित रुग्णाच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेकडे पाठवले असून, अहवाल अद्याप मिळायचा आहे. 

कृती दलाच्या बैठकीनंतर बोलताना आरोग्य खात्याचे लिंक सचिव संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रसंगी खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते. संशयित रुग्ण पत्नीसह गोव्यात आला होता. तो कायम प्रवास करणारा (ट्रॅव्हलर) असून घसा खवखवण्याची लक्षणे त्याच्यात दिसून आलेली आहे. तो चीनमधून आलेला असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे, असे संजय कुमार यांनी सांगितले. भारतात अद्याप कोरोना व्हायरसचा एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. गोव्यातही घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. 

थर्मल स्कॅनरची मागणी 

खबरदारीच्या सर्व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या अनुषंगाने कृती दलाची पहिली बैठक काल झाली. विमानतळ अधिकारी, बंदर अधिकारी, डॉक्टर संघटना आदी सर्वांशी खाते समन्वय ठेवून आहे. राज्य सरकारचे पथक केंद्रीय आरोग्य पथकाशी संपर्क ठेवून आहे. या व्हायरसबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठीही पावले उचलली आहेत. भारत सरकारने याबाबतीत संवेदनशील विमानतळांवर सतर्कता बाळगली आहे. तेथे थर्मल स्कॅनर वगैरे दिले आहेत. दाबोळी विमानतळाचा यात समावेश नाही. गोवा पर्यटनस्थळ असल्याने येथेही थर्मल स्कॅनर बसविण्याची विनंती आम्ही केली आहे, असे संजय कुमार यांनी सांगितले. 

काय आहेत लक्षणे? 

डॉ. बांदेकर म्हणाले की, सामान्यपणे होणारी सर्दी, ताप, घसा खवखवणे यासारखी लक्षणे असतात. श्वासोश्वासात प्रचंड त्रास होतो. न्युमोनिया तसेच मूत्रपिंडावर परिणाम होतो. हा व्हायरस नवीन असून अजून त्यावर संशोधन व्हायचे आहे. आजारावर अजून लस सापडलेली नाही. या व्हायरसने केवळ चीनमध्येच मृत्यू झालेले आहेत. अन्यत्र केवळ संशयित रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ५३ रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत. 

गोमेकॉत स्वतंत्र वॉर्ड ; ३0 खाटांची सोय 

कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी गोमेकॉत स्वतंत्र वॉर्डमध्ये ३0 खाटांची सोय केली असून चिखली येथे कॉटेज इस्पितळात ७ खाटा उपलब्ध केल्या आहेत. विमानतळ जवळ असल्याने चिखलीतील इस्पितळातही स्वतंत्र विभाग केला असल्याचे खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी सांगितले. लोकांनी घ्यावयाच्या दक्षतेबद्दल जागृती केली जाणार आहे, असे ते म्हणाले. चीनमधील ज्या शहरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्या शहरापासून संशयित रुग्णाचे वास्तव्य ७५0 किलोमिटर दूर होते एवढेच सांगण्यात आले. या रुग्णाबाबत कोणतीही अधिक माहिती देण्याचे आरोग्य अधिकाºयांनी टाळले. 

Web Title: A suspected patient of corona virus in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.