गोव्यातील एका मंदिराची फंड पेटी फोडून रक्कम चाेरी प्रकरणात संशयिताची शिक्षा कायम
By सूरज.नाईकपवार | Published: November 8, 2023 04:42 PM2023-11-08T16:42:55+5:302023-11-08T16:43:53+5:30
याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी सुदन याच्या विरोधात भांदसंच्या ३८० कलमाखाली गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
मडगाव : गोव्यातील दक्षिण गोवा येथे बाळ्ळी येथील एका मंदिराची फंड पेटी फोडून आतील रक्कम चोरी प्रकरणात संशयित सुदन गोंदलेकर (४२) याला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा मडगावच्या न्यायालयाने कायम ठेवली आहे. पाेडके बाळ्ळी येथील श्री सती देवी मंदिरात १९ नोव्हेंबर २०१९ रोजी फंड पेटी फाेडून आतील ११,८१० रुपये चोरीला गेले होते.
याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी सुदन याच्या विरोधात भांदसंच्या ३८० कलमाखाली गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात संशयिताला दाेषी ठरवून ३ महिने कैद व १ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच चाेरीला गेलेली रक्कम अपिलाच्या मुदतीनंतर वरील देवस्थानकडे सुपूर्द करावी, असा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या निवाड्याला संशयिताने मडगावच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयात संशयिताच्या अपिलावर सुनावणी होऊन कनिष्ठ न्यायालयाचा निवाडा कायम ठेवण्यात आला. त्याला शिक्षा भोगण्यासाठी ताब्यात घ्यावे, असा आदेशही न्यायालयाने दिला.