कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करा  : शिवसेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 06:21 AM2018-05-04T06:21:14+5:302018-05-04T06:21:14+5:30

सांगे गावातील विद्युत हेल्पर देविदास वेळीप याचा विजेचा धक्का बसून झालेल्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या एकूणच निष्काळजीपणाची तपशीलवार चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Suspend junior engineer: Shiv Sena | कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करा  : शिवसेना 

कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करा  : शिवसेना 

googlenewsNext

पणजी : सांगे गावातील विद्युत हेल्पर देविदास वेळीप याचा विजेचा धक्का बसून झालेल्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या एकूणच निष्काळजीपणाची तपशीलवार चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. वेळीप यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी गोवा शिवसेनेच्या उपाध्यक्ष व प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक, कार्यकारिणीचे सदस्य वंदना लोबो, झायगल लोबो, रजनी वेळुस्कर, श्रीकृष्ण वेळुस्कर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष अलेक्सी फर्नांडिस, केपे तालुका प्रमुख संजय देसाई यांनी आज पणजीच्या मुख्य विद्युत अभियंत्यास सादर केलेल्या निवेदनात केली आहे.  निवेदनात म्हटले आहे, की आमच्या माहितीनुसार वेळीप हे आपल्या विभागात हेल्पर म्हणून काम करीत होते आणि त्यांनी लाइनमनला सहाय्य करणेच अपेक्षित होते. लाइनमनला विजेबाबतचे आणि वीजवाहक तारेत निर्माण झालेली समस्या कशी हाताळावयाची याचे ज्ञान असते. 

      अशी पेचप्रसंगाची परिस्थिती कशी हाताळावयाची याचे कोणतेही औपचारिक ज्ञान नसतानाही वेळीप यांना वीजवाहिनीवर काम करण्यास पाठविण्यात आले, हे धक्कादायक आहे. अशा कामांसाठी बंधनकारक असणारी संरक्षक साधनेही त्यांच्याजवळ नव्हती, असेही म्हटले आहे. विद्युत विभागाने या प्रकरणी तपशीलवार चौकशी करून वेळीप यांना हे धोकादायक काम करायला लावून त्यांचा जीव घेणाऱ्या लोकांना जबाबदार धरावे अशी आमची मागणी आहे.

सांगे विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची ही नैतिक जबाबदारी असल्याने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करावे. तो यापुढेही सेवेत राहिल्यास पुराव्यात फेरबदल करू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.चौकशी १५ दिवसांत केली जावी आणि अहवाल जाहीर केला जावा. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर भारतीय दंडविधानाच्या संबंधित कलमांखाली आरोप ठेवावेत. खून नव्हे पण सजापात्र मनुष्यवध या कलमाचा त्यात समावेश असावा, असे सेनेने म्हटले आहे. मृत हेल्पर हा त्याच्या कुटुंबाचा एकमेव कर्ता पुरुष असल्याने त्याच्या पत्नीला विद्युत विभागात त्वरित नोकरीस ठेवण्यात यावे, अशी आणखी एक मागणी केली आहे.

Web Title: Suspend junior engineer: Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.