इफ्फीत ‘टॉक्सिक’ला सुवर्णमयूर
By किशोर कुबल | Published: November 28, 2024 08:10 PM2024-11-28T20:10:18+5:302024-11-28T20:12:29+5:30
उत्कृष्ट अभिनेत्री वेस्ता मात्युलिट व लिव्हा रुपिकेत तर उत्कृष्ट अभिनेता क्लेमेंत फावीयु, ऑस्ट्रेलियन निर्माता फिलिप नॉयस जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
किशोर कुबल, पणजी : गोव्यात ५५ व्या इफ्फीच्या शानदार समारोप सोहळ्यात ‘टॉक्सिक’ या लिथियुआनियन चित्रपटाला प्रतिष्ठेचा सुवर्णमयूर पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार याच चित्रपटातील वेस्ता मात्युलिट व लिव्हा रुपिकेत यांना तर उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार क्लेमेंत फावीयु यांना मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार ‘द न्यु इयर दॅट नेव्हर केम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन बोगदान मुरेसानू यांना प्राप्त झाला. सुवर्णमयुरसाठी १५ आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत होते. कथानक व दिग्दर्शन साअले ब्लिअवेट यांचे आहे.
युनेस्को गांधी पदक 'क्रॉसिंग' चित्रपटासाठी तर विशेष ज्युरी पुरस्कार ‘होली काउ’ या चित्रपटासाठी प्राप्त झाले. सर्वोत्कृष्ट ओटीटी पुरस्कार 'लंपन' चित्रपटाला मिळाला. ऑस्ट्रेलियातील दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना सत्यजित राय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना रौप्य मयूर पदक, प्रमाणपत्र, शाल, मानपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात आले.
दोनापॉल येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या समारोप सोहळ्यास सिनेमॅटिक जगताचे चैतन्य आणि विविधता यांची सांगड यावेळी दिसून आली.७५ देशांमधील २०० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले तर सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टरक्लासही झाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत याप्रसंगी बोलताना म्हणाले कि,‘ जगभरातील दिग्दर्शक, निर्मात्यांनी गोव्यात येऊन चित्रिकरण करावे यासाठी ‘एक खिडकी योजना’ आणली जाईल. यामुळे परवानग्या लवकर मिळतील.’
‘घरत गणपती’ साठी नवज्योत बांदिवडेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
५५ व्या इफ्फीच्या समारोपात मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ ला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाला. नवज्योत बांदिवडेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून गेल्या जुलैमध्ये तो रीलीज झाला होता. या चित्रपटात कौटुंबिक बंधांची गुंतागुंत कौशल्याने दाखवण्यात आली आहेत. प्रमाणपत्र आणि ५ लाख रुपये रोख पारितोषिक असे या पुरस्काराची स्वरुप आहे. भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल विशेष ओळख पुरस्कार अभिनेता अल्लू अर्जुन यांना देण्यात आला. त्यांच्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा २’ ला विशेष मान्यता मिळाल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समारोपानंतर संगीत, नृत्य आणि सिनेमॅटिक आकर्षणाचे मिश्रण असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला.