स्वामींनी बॉम्ब टाकला; ब्रह्मेशानंद स्वामी जाहीरपणे बोलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 10:23 AM2024-03-15T10:23:03+5:302024-03-15T10:23:51+5:30
आपले डोके सुन्न झाले, धक्का बसला, कळंगुट आता थायलंडसारखे झालेय अशा शब्दांत ब्रह्मेशानंद स्वामींनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
कुंडई तपोभूमीचे स्वामी ब्रह्मेशानंद हे जाहीरपणे सत्य बोलले आहेत. कळंगुटच्या एका लेनमध्ये पोहोचलो आणि धक्काच बसला. कारण तो भाग थायलंड झाल्यासारखे वाटले, अशी खंत बुधवारी स्वामींनी व्यक्त केली आहे. गोव्यातील राज्यकर्त्यांनी आता थोडा तरी विचार करावा. भारतीय संस्कृतीच्या गोष्टी सांगणाऱ्या काही राजकारण्यांनी गोव्यात कसिनो जुगार नियमितपणे फोफावत राहील, याची काळजी घेतली. त्याची फळे पणजी शहर व गोवा राज्य भोगतेय, अर्थात स्वामी अजून कसिनोंविषयी बोललेले नाहीत. ते कळंगुटविषयी व थायलंड विषयी बोलले. आपले डोके सुन्न झाले, धक्का बसला, कळंगुट आता थायलंडसारखे झालेय अशा शब्दांत ब्रह्मेशानंद स्वामींनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
सर्वसामान्य व सज्जन गोमंतकीयांच्या मनात याच भावना आहेत. हिंदू बहुजनांच्या मनातील भावना ब्रह्मेशानंद स्वामींनी व्यक्त केल्या आहेत. गोव्यात या विषयावर निदान कालपासून नव्याने चर्चा तरी सुरू झाली. शिक्षक व पालकांनी मिळून हे चित्र बदलायला हवे, गोव्याला चांगले दिवस पुन्हा आणायला हवेत, असे स्वामींना वाटते. त्यांचा हेतू प्रामाणिक असला, तरी गोव्यातील राजकारणी आता सल्ला ऐकायच्या व विचार करायच्या पलीकडे पोहोचले आहेत.
पैसा हेच सर्वस्व झालेय हे काही मंत्री, आमदारांचे निर्णय पाहून कळून येतेच. थायलंड हे सेक्स टुरिझमसाठी जगभरातील पर्यटकांना ठाऊक आहे. तिथे कायदेशीर मान्यतेने सगळीकडे सेक्स टुरिझम फोफावले आहे. मसाजच्या नावाखालीही तेच चालते. कळंगुट किंवा गोव्याच्या एकूण किनारपट्टी भागात वेगळे काय चालते? ड्रग्जच्या नशेखाली गोव्याची युवा पिढी बरबाद होत आहे. ड्रग्ज आता केवळ पर्यटकांपुरते मर्यादित राहिलेले नाही.
पणजी, मडगाव, वास्कोसह काही तथाकथित उच्चभू कुटुंबांतील मुले-मुली गोव्याच्या किनारी भागातील जीवनात बेहोश होत आहेत. पिढीजात मिळालेली संपत्ती व वडिलोपार्जित पैसा उधळण्याची स्पर्धा लागली आहे. हे कमी म्हणून की काय सगळीकडे कॅसिनोंचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नदीतही कसिनो व हॉटेलातही जुगाराचे अड्डे. अनेक गोयंकार कुटुंबे उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. काही मंत्रीही पूर्वी कॅसिनोत खेळायला जायचे. त्यातील दक्षिण गोव्यातील एकजण गेल्या निवडणुकीत पराभूत झाला.
उत्तर व दक्षिण गोव्याची किनारपट्टी बड्या धनिक परप्रांतीय व्यावसायिकांच्या हाती गेली आहे. काही अड्यांवर किंवा केंद्रांवर पोलिसांचे अधूनमधून छापे पडतात; पण ते नावापुरते. वेबसाइट्सवरून काहीजण मुली पुरवू अशी जाहिरात करतात. मध्यंतरी काहीजणांचे बिंग फुटले होते. गोव्याविषयी काहीजण मुद्दाम चुकीची प्रतिमा निर्माण करतात. पर्यटकांची फसवणूक व्हावी, या हेतूनेही बदनामी करून पर्यटकांना आर्थिकदृष्ट्या लुटले जाते. किनारी भागात काही रेस्टॉरंटवाले तसेच काही दलाल मोबाइलवर उगाच मुलींचे फोटो दाखवतात आणि पर्यटकांना लुटतात. पूर्वी पोलिसांकडेही अशा तक्रारी पोहोचल्या आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना तर नाडलेच जाते. सत्तेतील मंडळी हे थांबवणार नाहीत. यासाठी समाजालाच जागृत व्हावे लागेल. ब्रह्मेशानंद स्वामींना कळंगुटमध्ये गेल्यानंतर थायलंडची आठवण आली, कारण काही भागांत भयानक चित्र आहेच. ते नाकारता येत नाही.
गोव्यात एका बाजूने किनाऱ्यावर परशुराम यांचा मोठा पुतळा उभा केला जातो. अनेक शहरे व गावांत शिवजयंती दिमाखात साजरी केली जाते. छत्रपती शिवरायांचे तेजस्वी पुतळे उभे केले जातात. मात्र, याच गोव्याच्या किनारी भागाचे सांस्कृतिकदृष्ट्या लचकेही तोडले जात आहेत. सनबर्न व्हायलाच हवा, असा आग्रह काही राजकारणी दरवर्षी धरतात. परवानगी देणार नाही, असे सांगून काहीजण स्वतःचा भाव वाढवतात व मग परवानगी देतात. रात्री क्लबमध्ये जाऊन व्यसनाधीन होणारे, जागरण करणारे आणि दारू पिऊन वाहन अपघात करणारे तरुण आपल्या राज्यात संख्येने कमी नाहीत. गोव्याचे सांस्कृतिक पर्यावरण पूर्ण दूषित झाले आहे. शिवाय डोंगर व टेकड्याही नष्ट केल्या जात आहेत. दिल्लीवाल्यांची लॉबी गोव्याला ओरबाडत आहे. गोव्याचे काही 'आयएएस', 'आयपीएस' अधिकारी यांना हे सगळे ठाऊक आहे. अनेकदा गोव्याची चर्च संस्था पर्यावरण रक्षणाच्या विषयावर आवाज उठवत असते. ब्रह्मेशानंद स्वामींनीही कधी अशा विषयांवर, तसेच कसिनोसारख्या विषयांवरही बोलायला हवे. शाब्दिक बॉम्ब टाकण्याचे धाडस करावेच लागेल.