'गोव्यात गोमांसबंदी करा, पर्रीकरांची प्रकृती सुधारेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 02:28 PM2018-11-12T14:28:12+5:302018-11-12T14:29:55+5:30
मनोहर पर्रीकरांची प्रकृती सुधारण्यासाठी 'या' व्यक्तीचा अजब सल्ला
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पर्रीकर काही दिवसांपूर्वी उपचारासाठी अमेरिकेलादेखील गेले होते. त्यानंतर एम्स रुग्णालयातही त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर आता पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी अजब सल्ला दिला आहे. गोव्यात तातडीनं गोमांसबंदी केल्यास पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असा अजब दावा चक्रपाणी यांनी केला आहे.
मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं गोव्यात नेतृत्त्व बदल गरजेचा असल्याचं मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल व्यक्त केलं होतं. यानंतर चक्रपाणी यांनी राज्यात गोमांसबंदी करण्याची मागणी केली. गोमांसबंदी लागू झाल्यास मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे चक्रपाणी यांची ही अजब मागणी पर्रीकरांच्या विचारसरणीशी सुसंगत नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच पर्रीकर यांनी गोमांस व्यापाराचं समर्थन केलं होतं. देशातील अनेक राज्यांमध्ये गायींची, गोमांसाची वाहतूक करणाऱ्यांवर हल्ले होत असताना पर्रीकर ठामपणे गोमांस व्यापाऱ्यांच्या बाजूनं उभे राहिले होते.
मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठिक नसल्यानं त्याचा परिणाम राज्य कारभारावर होत असल्याची टीका विरोधकांनी वारंवार केली आहे. काँग्रेसच्या या टीकेनंतर पर्रीकर यांनी त्यांच्या निवासस्थानी कॅबिनेट बैठक घेतली. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातून पर्रीकर यांना 14 ऑक्टोबरला डिस्चार्ज मिळाला. यानंतर त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.