स्वीमिंग पूलचा वापर चित्रीकरणासाठी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:33 AM2017-07-21T02:33:28+5:302017-07-21T02:33:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यातील सरकारी स्वीमिंग पुलांचा वापर यापुढे खेळाडूंची गैरसोय करून सिनेमांच्या चित्रीकरणासाठी करू दिला जाणार नाही,
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : राज्यातील सरकारी स्वीमिंग पुलांचा वापर यापुढे खेळाडूंची गैरसोय करून सिनेमांच्या चित्रीकरणासाठी करू दिला जाणार नाही, असे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
मी क्रीडामंत्री असतानाच राज्याचे क्रीडा धोरण तयार झाले. तत्पूर्वी ते कधीच तयार झाले नव्हते. त्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळू लागले. खेळाडू तयार करण्यासाठी अधिकाधिक मदत करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. राज्यात क्रीडा क्षेत्रात साधनसुविधा कमी नाहीत. मैदाने तर प्रत्येक ठिकाणी आहेत. खेळाडूच तयार व्हायला हवेत. फुटबॉलसाठी प्रशिक्षकांची संख्या प्रचंड आहे; पण खेळाडू किती तयार होतात ते पाहावे लागेल. स्वीमिंगच्या क्षेत्रात जे युवक-युवती व मुले वावरत आहेत, त्यांना सरकार प्रोत्साहन देईल. त्यांची गैरसोय करून यापुढे स्वीमिंग पुलांचा वापर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी करू दिला जाणार नाही, असे मंत्री आजगावकर यांनी नमूद केले. खेळाडूंसाठी सरकार निधी खर्च करील आणि मुख्यमंत्री त्यासाठी निश्चितच निधी उपलब्ध करून देतील, असा विश्वास मंत्री आजगावकर यांनी व्यक्त केला.
कुमारी शृंगी राजेश बांदेकर व इतरांनी स्वीमिंग स्पर्धेत राष्ट्रीय व राज्य स्पर्धांमध्ये मोठे यश मिळवून विविध पदके प्राप्त केल्याबाबत त्या सर्वांचे विधानसभेत गुरुवारी अभिनंदन करण्यात आले. अभिनंदनाचा ठराव आमदार नीलेश काब्राल यांनी मांडला होता. मंत्री आजगावकर यांनीही या खेळाडूंचे अभिनंदन केले व क्रीडा क्षेत्रात यापुढेही जास्त सुविधा निर्माण करू, अशी ग्वाही दिली.
आमदार नीळकंठ हळर्णकर, दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव, प्रसाद गावकर, प्रतापसिंग राणे आदींनी या वेळी आपले विचार मांडले व खेळाडूंचे अभिनंदन केले. स्वीमिंगच्या क्षेत्रातील खेळाडूंना यापूर्वीच्या सरकारच्या काळात परप्रांतामध्ये जाताना क्रीडा खात्याकडून केवळ शंभर-दीडशे रुपयांची बॅग देण्यात आली. जलतरण क्षेत्रात नाव कमावू पाहणाऱ्या खेळाडूंसाठी सरकारने प्रशिक्षकांची सोय करावी. आम्ही काही पालकांनी अशा खेळाडूंसाठी स्वखर्चाने प्रशिक्षक नेमलेले आहेत, असे हळर्णकर यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघात स्वीमिंग पूलची व्यवस्था व्हावी, असे राणे म्हणाले.