दोन गोमंतकीय युवकांना दुबईत 500 वर्षे कैदेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 12:23 PM2018-04-11T12:23:11+5:302018-04-11T12:48:24+5:30
तब्बल 200 दशलक्ष डॉलर्सचे गुंतवणूक घोटाळा प्रकरण
पणजी - तब्बल 200 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात दुबई कोर्टाने गोव्याच्या सिडनी लेमॉस (वय 37 वर्ष) आणि त्याचा हिशेब तपासनीस रायन डिसोझा (वय 25 वर्ष) या दोघांना प्रत्येकी 500 वर्षांपेक्षा जास्त कैदेची शिक्षा ठोठावली आहे. गुंतवणुकीवर दरसाल १२0 टक्के व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी घेतल्या आणि त्यांना गंडा घातल्याचा आरोप या दोघांवर होता.
सिडनी हा फुटबॉलपटू असून 2015 साली एफसी गोवा संघाचा तो पुरस्कर्ता होता. दुबईत त्याचा स्वत:चा एफसी बार्देस क्लब आहे. निवृत्त लोकांना आमिषे दाखवून तो त्यांच्याकडून ठेवी स्वीकारत असे. मार्च 2016 पासून त्याने व्याज देणे बंद केले त्यामुळे दुबईतील आर्थिक विभागाने त्याच्या कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर टाळे तोडून बेकायदेशीररित्या कार्यालयात प्रवेश केल्या प्रकरणी तसेच दस्तऐवज नेल्या प्रकरणी लेमॉस याची पत्नी वॅलनी हिच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
सिडनी हा गोव्यातील शिवोली येथील असून गेल्या वर्षी फेब्रुवारीत दुबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. तो भारतात परतण्याच्या बेतात होता तर पत्नी वेलनी तेथून निसटण्यात यशस्वी ठरली. दुबईत स्थायिक झालेल्या गोव्यातील अनेकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली होती.
दुबईतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही या शिक्षेविरुद्ध अपील करु शकतात परंतु त्यांना तब्बल 500 वर्षांची शिक्षा ठोठावल्याने जन्मठेप तर भोगावीच लागणार आहे. त्यामुळे या दोघांची लवकरच दुबईच्या अल आविर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली जाणार आहे.
दरम्यान, रायन याचे पिता मार्तिर्स डिसोझा यांनी या शिक्षेमुळे आपल्या धक्का बसल्याचे म्हटले आहे. आपला मुलगा निष्पाप आहे आणि त्याला या प्रकरणात बळीचा बकरा बनविण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. सिडनी याच्या कंपनीला टाळे लागण्याआधी केवळ चार महिने तो तेथे अकौंटंट म्हणून कामाला लागला होता. या प्रकरणात सिडनी याचा उजवा हात मानला जाणारा व्यवस्थापक मात्र निसटल्याचे ते म्हणाले. रायन हाही फुटबॉलपटू असून व्यवसायिक फुटबॉल लीग स्पर्धांमध्ये तो खेळलेला आहे.