प्रतापसिंग राणेवर कारवाई करा; काँग्रेसची हायकमांडकडे जाहीर मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 08:49 PM2018-08-11T20:49:20+5:302018-08-11T20:50:30+5:30
‘लंडनमध्ये काही गोमंतकीय स्वच्छतागृह साफ करतात’ या कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचे विधानसभेतील विधानामुळे निर्माण झालेला असंतोष शमण्याचे नाव घेत नाही.
पणजी: ‘लंडनमध्ये काही गोमंतकीय स्वच्छतागृह साफ करतात’ या कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचे विधानसभेतील विधानामुळे निर्माण झालेला असंतोष शमण्याचे नाव घेत नाही. कॉंग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी हाय कमांडकडे केली.
कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, सिद्धनाथ बुयांव, संकल्प आमोणकर, विजय भिके, उर्फान मुल्ला, तसेच कॉंग्रेसनेते जनार्दन भंडारी यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसच्या हाय कमांडने प्रतापसिंह राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपल्याच पक्षाच्या एखाद्या जेष्ठ नेत्याविरुद्ध कारवाी करण्याची मागणी कॉंग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. तसेच कॉंग्रेसचया नेत्याने हे वक्त्व्य केल्याबद्दल कॉंग्रेसतर्फे लोकांची जाहीर माफी मागण्यात आली.
पणजीकर यांनी यावेळी सांगितले ‘गोव्यातील लोक विदेशात जातात ते इथे रोजगार नाही म्हणून, आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी. या लोकांबद्दल पक्षाला अभिमान आहे. राणे यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही. राणे यांनी लोकांची यासाठी माफी मागावी.’ सिद्धनाथ बुयांव यांनीही राणे यांच्याकडून लोकांना स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त केली. त्यांना तसे म्हणायचे नसेलही, परंतु त्यांना नेमके काय म्हणायचे होते ते त्यांनी लोकांना स्पष्ट करून सांगावे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना तसे सांगण्यास भाग पाडावे असे ते म्हणाले. अन्यथा त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी असे सांगितले. संकल्प आमोणकर यांनीही या वक्तव्यामुळे अनेक गोमंतकीय दुखावले असल्याचे सांगितले. कॉंग्रेस त्यांच्या भावनांशी सहमत आहे व त्यांच्या बरोबर आहे. हे लोक आपल्या कुटुंबासाठी जो त्याग करतात त्या बद्दल पक्षाला त्यांचा अभिमान आहे असे ते म्हणाले. उर्फान मुल्ला यांनी गोव्यातील सर्वच धर्माचे लोक विदेशात नोकरीला आहेत असे सांगितले. खुद्द राणे यांच्या मतदारसंघातीलही लोक असल्याचे ते म्हणाले.